महायुतीच्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन विकासकामे पूर्ण करा:आ. धर्मराव बाबा आत्राम
मुलचेरा पंचायत समितीची आढावा सभा संपन्न; विविध विभागांचे कामकाज तपासले, पाणीटंचाई टाळण्याचे स्पष्ट निर्देश
मुलचेरा : महायुतीच्या सर्व घटकांना सोबत आणि विश्वासात घेऊन तालुक्यातील सर्व विकासकामे तातडीने पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश माजी मंत्री तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले.
सोमवारी मुलचेरा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. या बैठकीत विविध विभागातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला असून, अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्टीर बिश्वास, पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्णा येमूलवार, गटविकास अधिकारी विजय पेंदाम, नगरपंचायतचे उपाध्यक्ष मधुकर वेलादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते रंजित स्वर्णकार, सरपंच जया मंडल, मनोज बंडावर, अमित मुजुमदार, निखिल इज्जतदार आदी मान्यवर उपस्थित होते.पंचायत समितीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारीही या सभेला हजेरी लावली होती.
आढावा सभेत आ. आत्राम यांनी घरकुल योजना, बांधकाम कामे आणि इतर विभागातील प्रलंबित प्रकल्पांची स्थिती जाणून घेतली. विशेषतः घरकुल योजनेअंतर्गत आणि काही ठिकाणी पूर्ण झालेल्या बांधकाम कामांचे बिल अद्याप न मिळाल्याची तक्रारी समोर आल्या. यावर आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. “बिलांची प्रलंबिता दूर करा आणि विकासकामांना गती द्या,” असे त्यांनी बजावले.सर्व सामान्य नागरिकांना त्रास देऊ नका, असा इशाराही आमदारांनी दिला. उन्हाळ्याचा काळ सुरू झाला असून, पाण्याची टंचाई होणार नाही याकडे सर्व विभागांनी विशेष लक्ष द्यावे, असे स्पष्ट निर्देश दिले.
शासनाच्या सर्व लोककल्याणकारी योजनांचा प्रभावीपणे प्रचार करून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्या, असेही त्यांनी सांगितले. “शेवटच्या घरापर्यंत योजनांचा लाभ नेला जावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,” असे आवाहन केले.या आढावा सभेमुळे तालुक्यातील विकासकामांना वेग येईल आणि नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील, अशी अपेक्षा आहे. मुलचेरा तालुक्यातील विविध गावांमधील पाणीपुरवठा, रस्ते, बांधकाम आणि इतर मूलभूत सुविधांसाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.