Home Breaking News आश्रमशाळेतील दोन शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा विनयभंग ; २४ विद्यार्थिनींची ‘बॅड टच आणि...

आश्रमशाळेतील दोन शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा विनयभंग ; २४ विद्यार्थिनींची ‘बॅड टच आणि मारहाणी ‘बाबत तक्रार

0
50

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरी अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, लोहारा येथील विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून दोन शिक्षकांवर मूलचेरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याने आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय आश्रमशाळा लोहारा येथील पदवीधर शिक्षक संदीप शिवाजी फड आणि माध्यमिक सुभाष खुशबराव लांडे यांच्याविरुद्ध येथील २४ विद्यार्थिनींनी शाळेतील अधीक्षिकाकडे शनिवारी ‘बॅड टच आणि मारहाण’ बाबत तक्रार दिली होती. संबंधित अधीक्षिकाने येथील मुख्याध्यापक पुरी यांच्याकडे तक्रार देताच या गंभीर बाबीची दखल घेऊन मुख्याध्यापकांनी रविवारी सकाळीच अहेरीचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांना या घटनेची माहिती दिली. प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांनी साहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) सुहास वसावे आणि साहाय्यक प्रकल्प (शिक्षण) एस. पी. डोंगरे यांना रविवारी संबंधित शाळेत चौकशीसाठी पाठविले.

चौकशीअंती गुन्हा झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लोहारा शासकीय आश्रमशाळेतील तब्बल २४ विद्यार्थिनींना सोमवारी वैद्यकीय चाचणीसाठी ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे पाठविण्यात आले. मात्र या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस तक्रार झाल्याशिवाय वैद्यकीय चाचणी होणार नसल्याने कळताच तत्काळ मुलचेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मुलचेरा पोलिसांनी सदर विद्यार्थिनींची चौकशी करून फिर्यादीच्या सांगण्यावरून पदवीधर शिक्षक संदीप शिवाजी फड यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि मारहाणीचा तर माध्यमिक शिक्षक सुभाष खुशबराव लांडे यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. सध्या दोन्ही शिक्षकांना पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई मुलचेरा पोलीस करीत आहेत.

विशेष म्हणजे, संदीप फड हे कन्या शाळा सोडे आणि सुभाष लांडे हे इंग्रजी माध्यमिक शाळा गडचिरोली येथून याच शैक्षणिक सत्रात लोहारा येथील शासकीय आश्रमशाळेत रुजू झाले होते. नुकतेच भामरागड प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने येथील विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. या घटनेचे गांभीर्य पाहून येथील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता अहेरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मुलचेरा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा लोहारा येथील दोन शिक्षकांवर येथील विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांनी तत्काळ शाळेत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीत अंतिम गुन्हा निष्पन्न होताच संबंधित शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

– एस. पी. डोंगरे,

साहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here