![]()
पोलाद प्रकल्पाला तीव्र विरोध; विशेष ग्रामसभेत सरपंचांच्या निर्णयावर गावकऱ्यांचा एल्गार,केली ग्रामसभाच तहकूब
आनंद दहागावकर/गडचिरोली
गडचिरोली:मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली ग्रामपंचायतीत मेटास्टील इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पोलाद प्रकल्पाला गावकऱ्यांनी एकत्रितपणे कडाक्याचा विरोध करत सरपंचांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर घेतलेल्या विशेष ग्रामसभेला बहिष्कार टाकला. सोमवारी (९ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता आयोजित झालेल्या या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कंपनीला जमीन देण्याच्या प्रयत्नाला विरोध दर्शवला आणि ग्रामसभाच तहकूब करण्याचा निर्णय घेतला. या ग्रामसभेत सरपंच, कंपनी प्रतिनिधी आणि दलालांवर गावकऱ्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
अडपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या विविध गावांतील शेकडो नागरिकांनी विशेष ग्रामसभेसाठी हजेरी लावली होती. मात्र, रविवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी सरपंचांनी गावात नोटीस चिकटवून तात्काळ ग्रामसभा बोलावल्याबद्दल गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. “नोटीस चिकटवून तत्काळ ग्रामसभा घेण्याची काय गरज होती? गावकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कंपनीला जमीन देणार कोण?” असा सवाल उपस्थित करत गावकऱ्यांनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे, ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पूर्वीच्या सभेतच गावकऱ्यांनी कंपनीचा स्पष्ट विरोध करत जमीन विक्री न करण्याचा ठराव पारित केला होता. तरीही सरपंचांनी परस्पर नोटीस लावून नवीन ग्रामसभा बोलावल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लहर उसळली.
ग्रामसभेत गावकऱ्यांनी कंपनीला जमीन देण्याच्या प्रयत्नांना चकमक दिली. “नागरिकांच्या संमतीशिवाय आमच्या जमिनी विकणारे तुम्ही कोण? कंपनीसाठी दलाल सक्रिय असून आमिष दाखवत घराघरात वाद निर्माण करत आहेत. अशा दलालांना धडा शिकवणारच” असे घोषणा देत गावकऱ्यांनी सरपंच आणि कंपनी प्रतिनिधींना चांगलाच धक्का दिला. वातावरण तापले असताना आष्टी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
४ फेब्रुवारीच्या सभेत आम्ही मेटास्टील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा विरोध करत जमिनी न विकण्याचा निर्णय घेतला होता. सरपंचांनी परस्पर नोटीस लावून तात्काळ ग्रामसभा बोलावण्याची काय गरज होती? आम्ही आमच्या जमिनी कधीच विकणार नाही.
-कवडू चल्लावार, ज्येष्ठ कार्यकर्ते
गावातील जमिनी कंपनीला देणार नाही, असा आमचा अखंड निर्णय आहे. यापुढे दलालीसाठी कुणी आलं तर त्यांना गावकऱ्यांनी धडा शिकवणारच.
–संदीप चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, अडपल्ली