गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत सुरक्षा दलांना यश आले असून, ‘कंपनी क्रमांक १०’चा म्होरक्या प्रभाकर याच्यासह सात जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तीन दिवस आणि तीन रात्री चाललेल्या या थरारक चकमकीनंतर नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले असून, ३१ मार्चपर्यंत जिल्ह्याचे नक्षलवादातून समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
छत्तीसगड आणि भामरागड तालुक्यांच्या सीमावर्ती भागात झालेल्या या चकमकीत नक्षल्यांचे गड उद्ध्वस्त केले. चकमकीत सी-६० पथकाचे जवान दीपक मडावी यांना वीरमरण आले, तर अन्य एक जवान जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
या कारवाईत मारल्या गेलेल्या सात नक्षलवाद्यांची ओळख पटली असून, त्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. प्रामुख्याने दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य आणि कंपनी १० चा प्रभारी प्रभाकर (५७) याच्यासह कंपनी ५ चा कमांडर पागू मोडयाम यांचा समावेश आहे. या सर्व नक्षलवाद्यांवर एकत्रितपणे २०० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असून महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकूण ७१ लाख रुपयांचे बक्षीस होते. विशेष म्हणजे, तेलंगणाचा रहिवासी असलेल्या प्रभाकरला आतापर्यंत १० वेळा आत्मसमर्पणाचे आवाहन करण्यात आले होते, परंतु त्याने हिंसेचा मार्ग सोडला नाही.
शोधमोहीम सुरूच
उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या भागात अद्यापही शोधमोहीम सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
ठार झालेल्या जहाल नक्षलवाद्यांची नावे
• प्रभाकर उर्फ चंदरराव (बक्षीस २५ लाख) : ११३ गुन्ह्यांची नोंद असलेला हा जहाल नक्षली कंपनी १० चा कणा होता.
• पागू मोडयाम (बक्षीस १६ लाख): कंपनी ५ चा कमांडर आणि घातक हल्ल्यांचा सूत्रधार.
• अनिला उर्फ बुदरी कोवाची (बक्षीस ८ लाख): प्रभाकरची अंगरक्षक.
• कामेश पदा (बक्षीस ८ लाख):
माड एरिया स्पेशल प्लाटूनचा कमांडर.
• भजनाथ उर्फ भिमा होळी (बक्षीस ६ लाख): परालकोट दलमचा सक्रिय सदस्य.
• मंगली कुरसाम (बक्षीस ४ लाख): कंपनी १० ची महत्त्वाची सदस्य.
• जोगी सोडी-मडावी (बक्षीस ६ लाख): कंपनी ५ ची सक्रिय सदस्य.