![]()
गडचिरोली : सोलापूर येथे पार पडलेल्या ‘उत्कर्ष २०२५-२६’ या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाने आपल्या शिस्तबद्ध कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या संघास ‘सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय संघ’ म्हणून बहुमान मिळाला असून, विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
४ ते ७ जानेवारी २०२६ दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना कक्ष (मंत्रालय, मुंबई) आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत राज्यातील विविध विद्यापीठांतील रासेयो (NSS) स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. राज्यातील अनेक नामवंत विद्यापीठांच्या सहभागामुळे अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या संघाने केवळ सादरीकरणातच नव्हे, तर वर्तणुकीतही छाप पाडली. वेळेचे काटेकोर पालन, संघभावना आणि सामाजिक जाणीव या गुणांच्या जोरावर परीक्षकांनी गोंडवाना विद्यापीठाची ‘सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय संघ’ म्हणून निवड केली. यावेळी विद्यापीठाला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
“हा सन्मान म्हणजे गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सातत्यपूर्ण कार्याची पोचपावती आहे. भविष्यातही आमचे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा नावलौकिक असाच वाढवत राहतील.” असा विश्वास रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे यांनी व्यक्त केला.
विद्यापीठाला मिळालेल्या या यशाबद्दल कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे, संघ व्यवस्थापक प्रा. अंतबोध बोरकर आणि सर्व सहभागी स्वयंसेवकांचे विशेष अभिनंदन केले आहे.
विद्यापीठाच्या या यशामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आणि शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.