![]()
आरोग्य सेवा, जनजागृती आणि शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन; गडचिरोली पोलिसांचा लोकाभिमुख उपक्रम
गडचिरोली !
दामरंचा, दि. 3 जून: अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाने दामरंचा येथील आठवडी बाजारात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श घालून दिला. या शिबिरात तज्ञ वैद्यकीय पथकाने तब्बल 90 नागरिकांची तपासणी करून मोफत औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
गडचिरोली पोलीस दल, पोलीस रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात डॉ. रोशन गिरसावळे, डॉ. रोशनी किरंगे, संतोष पवार आणि भास्कर जवंजाळ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची तपासणी करण्यात आली.
शिबिरादरम्यान विविध आजारांबाबत तपासणी करण्यात आली असून आवश्यक त्या नागरिकांना मोफत औषधे वितरित करण्यात आली. तसेच पोषण, आरोग्य आणि रोगप्रतिबंधक उपायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गंभीर स्वरूपाच्या आरोग्य समस्यांमुळे दोन नागरिकांना पुढील उपचारांसाठी विशेष रुग्णालयात पाठविण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाने सन 2021 पासून आतापर्यंत 202 आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करून 42 हजार 500 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. याशिवाय 5 रक्तदान शिबिरांतून 4 हजार 361 युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत 9 हजार 971 नागरिकांची नेत्र तपासणी करून 1 हजार 412 मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत.
यावेळी आठवडी बाजारात आलेल्या नागरिकांसाठी विशेष फिरती प्रदर्शनीही उभारण्यात आली होती. गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांचे बलिदान, सी-60 जवानांचे शौर्य आणि पोलीस दलाच्या विविध नागरी कृती उपक्रमांची माहिती बॅनरद्वारे देण्यात आली. या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्ती, सुरक्षा व सामाजिक जनजागृतीचा संदेश पोहोचविण्यात आला.
सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपपोस्टे दामरंचाचे पोउपनि. पृथ्वीराज बाराते, पोउपनि. अनिकेत संकपाळ तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.