अबुझमाड जंगल परिसरातील चकमकीत २५ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवादी ‘प्रभाकर’ सह सात नक्षल्यांना कंठस्नान
C-60 जवानाचे शौर्य : शहीद होण्यापूर्वी दोननक्षल्यांना धाडले यमसदनी; मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्तगडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरीलअबुझमाडच्या घनदाट जंगलात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानात गडचिरोली पोलिसांच्या C-60 पथकाला ऐतिहासिक यश आले आहे. या चकमकीत २५ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवादी नेता ‘प्रभाकर’ याच्यासह एकूण ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या कारवाईत सी-६० दलाचे जवान दीपक चिन्ना मडावी यांनी अतुलनीय शौर्य गाजवत वीरमरण पत्करले.
या अभियानातील सर्वात मोठे यश म्हणजे प्रभाकर (रा. कामारेड्डी, तेलंगणा) याचा खात्मा. प्रभाकर हा गडचिरोली विभागीय कमिटीचा प्रभारी, वेस्ट सब-झोनल ब्युरो प्रभारी आणि कंपनी क्रमांक १० चा प्रमुख होता. त्याच्यावर शासनाने २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्या मृत्यूनंतर माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे.
चकमकीत पोलिसांनी एकूण सात नक्षलवाद्यांना ठार केले आहे. यामध्ये ४ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. ३ एके-४७ (AK-47), १ एसएलआर (SLR) आणि १.३०३ रायफल अशी एकूण ५ अग्निशस्त्रे घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत. काल रात्रीपर्यंत ३ मृतदेह मिळाले होते, तर आज दिवसभरात आणखी ४ माओवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहेत.
अहेरी तालुक्यातील मांड्रा येथील रहिवासी असलेले जवान दीपक चिन्ना मडावी (३८) यांनी शहीद होण्यापूर्वी विलक्षण पराक्रम गाजवला. काल सायंकाळी झालेल्या तीव्र चकमकीत त्यांनी एकट्याने दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, या संघर्षात त्यांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांना वीरगती प्राप्त झाली. उद्या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
याच चकमकीत जखमी झालेले दुसरे जवान जोगा मडावी (रा. किष्ट्यापल्ली) यांच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत. सुदैवाने त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या धाडसी अभियानाबद्दल आणि ठार झालेल्या उर्वरित माओवाद्यांच्या ओळखीबाबत अधिकृत माहिती देण्यासाठी गडचिरोली पोलीस उद्या एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करणार आहेत. यामध्ये मोहिमेचे संपूर्ण तपशील समोर येण्याची शक्यता आहे.