पोलीस मुख्यालयात शहीद जवान दीपक मडावी यांना शासकीय मानवंदना ; चिमुकल्याचा ‘सॅल्यूट’ पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले
गडचिरोली : छत्तीसगड सीमावर्ती भागातील अबुझमाडच्या घनदाट जंगलात नक्षल्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेले सी-६० पथकाचे शूर जवान दीपक चिन्ना मडावी (३८) यांना आज (दि.०६) गडचिरोली येथे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी वातावरण अत्यंत शोकाकूल झाले होते.
शहीद दीपक मडावी यांचे पार्थिव आज दुपारी हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात आले. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन पार पडल्यानंतर पार्थिव पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आणले गेले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आणि शोकधून वाजवून या वीरपुत्राला मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, उपमहानिरीक्षक अंकित गोयल आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
“दीपक मडावी यांनी अत्यंत विपरीत आणि आव्हानात्मक परिस्थितीत नक्षल्यांशी धैर्याने लढा दिला. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. शासन आणि पोलीस प्रशासन त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल,” असे आश्वासन डॉ. रवींद्र सिंगल यांनी यावेळी दिले.
चिमुकल्याचा सॅल्यूट; उपस्थितांचा कंठ दाटला
मानवंदनेच्या वेळी एक अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. शहीद दीपक यांचा १० वर्षांचा मुलगा आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी आला होता. त्याने नातेवाईकाच्या कडेवर बसून आपल्या शहीद पित्याच्या पार्थिवाला जेव्हा ‘सॅल्यूट’ केला, तेव्हा उपस्थित प्रत्येक पोलीस अधिकारी आणि नागरिकाचा कंठ दाटून आला. आपल्या पोटच्या गोळ्याला तिरंग्यात गुंडाळलेले पाहून दीपक यांची वृद्ध माता शुद्ध हरपून खाली पडली, त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले.
पोलीस मुख्यालयातील सोहळ्यानंतर शहीद दीपक मडावी यांचे पार्थिव त्यांच्या अहेरी तालुक्यातील दामरंचा या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आले. या वीरपुत्राच्या निधनाने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, नक्षलवादाविरुद्धच्या लढ्यात पुन्हा एकदा एका जवानाने सर्वोच्च बलिदान दिले आहे.