Home Breaking News लाहेरी आश्रमशाळा विषबाधाप्रकरणी “विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड केल्यास गय करणार नाही!”, ...

लाहेरी आश्रमशाळा विषबाधाप्रकरणी “विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड केल्यास गय करणार नाही!”, आमदार डॉ. नरोटे यांचा इशारा…

0
50

 

भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या हलगर्जीपणाचा निषेध करत आमदार नरोटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि आदिवासी मंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी केली.

लाहेरी आश्रमशाळेत विषबाधेनंतर पाहणी करताना आमदार नरोटे 

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथीलशासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधेच्या घटनेने खळबळ उडाली असून, या गंभीर प्रकरणाची दखल घेत गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

लाहेरी आश्रमशाळेत विषबाधेची घटना घडल्याचे समजताच आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तातडीने शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेची माहिती त्यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांना भ्रमणध्वनीवरून देऊन येथील वस्तुस्थिती अवगत केली. बाधित झालेल्या ५८ विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. मात्र, एका विद्यार्थ्याला अधिक उपचाराची गरज असल्याने त्याला तातडीने नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

या घटनेच्या सखोल चौकशीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने शाळेतील पाण्याचे आणि अन्नाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. कर्तव्यात कसूर केल्याप्रप्रकरणी संबंधित अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, चौकशी अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, त्यामुळे पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही डॉ. नरोटे यांनी यावेळी केले.

या पाहणी दौऱ्यातभाजपा आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिस्वास, अर्जुन आलाम, प्रकल्प अधिकारी अमर राऊत, गट विकास अधिकारी गोंगले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष धकाते यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here