कोरची
कोरची पोलीस स्टेशन येथील २५ गुन्ह्यातील महाराष्ट्र दारूबंदी कायदा सदराखाली जप्त केलेल्या ६६ लाख ४९ हजार ८९५ रुपयांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्यांवर उत्पादक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी २ फेब्रुवारीला बुलडोझर फिरवला.
जिल्ह्यात दारूबंदी आहे मात्र छुप्या पद्धतीने तस्करी केली जाते दारू वाहतूक करणारे तसेच चोरीछुपे विक्री करणारे पोलिसांच्या नेहमीच रडावर असतात येथील पोलिसांनी २५ गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध कारवाई करून सुमारे ६६ लाख ४९ हजार ८९५ रुपयांची दारू जप्त केले होती. त्यामध्ये देशी दारूच्या १८० मिली मापाच्या २७१ बॉटल, विदेशी दारूच्या १८० मिलीमापाच्या ४३,७२९ बॉटल, बियरच्या ६५० मिलीमापाच्या २०४ बॉटल, बियरच्या ५०० मिली मापाच्या २०० टिनाचे कॅन, बियरच्या ३३० मिली मापाच्या १२५ टीनाच्या कॅन अशा एकूण दारूच्या बाटल्यांची संख्या ४४ हजार ५२९ इतकी होती.
जप्त केलेली दारू नष्ट करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या सहकार्याने न्यायालयाकडून परवानगी घेतली जाते परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २ फेब्रुवारीला कोरची पोलीस ठाण्याच्या आवारात गडचिरोली राज्य उत्पादक शुल्क दुय्यम निरीक्षक च. वि. भगत यांच्या उपस्थितीत दारूच्या बाटलांवर बुलडोझर फिरवला त्यानंतर चुरा झालेला बाटल्या एका खड्ड्यात पुरण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू नष्ट केल्याने तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे यावेळी कोरची पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार तसेच पोलीस अमलदार उपस्थित होते.


