Home Breaking News ताडगावच्या आठवडी बाजारात गडचिरोली पोलिसांचा आरोग्याचा हात!

ताडगावच्या आठवडी बाजारात गडचिरोली पोलिसांचा आरोग्याचा हात!

0
15

मोफत आरोग्य शिबिरात 61 नागरिकांची तपासणी; शहीद जवानांच्या बलिदानाचीही जनजागृती

गडचिरोली पोलीस, जिल्हा रुग्णालय व जि.प.च्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागात आरोग्य सेवा

गडचिरोली, दि. 29 : दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत मौजा ताडगाव येथील आठवडी बाजार परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. या अभिनव उपक्रमात पोस्टे ताडगाव हद्दीतील एकूण 61 नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार नागरिकांना मोफत औषधोपचार व आरोग्य मार्गदर्शनही करण्यात आले.

गडचिरोली पोलीस रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 29 मे 2026 रोजी आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांविषयी जागरूक करणे आणि त्यांना प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

या शिबिरामध्ये पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल मडावी आणि डॉ. श्रेया कुमरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले तसेच पोषण, सामान्य आजार आणि आरोग्य समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी 03 नागरिकांना पुढील उपचार व विशेष तपासणीसाठी विविध रुग्णालयात संदर्भित (रेफर) करण्यात आले.

पोलीस दलाचे आरोग्य क्षेत्रातील मोठे योगदान

गडचिरोली पोलीस दलाकडून सन 2021 पासून आजपर्यंत तब्बल 201 आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून, जवळपास 42 हजार 500 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय 05 रक्तदान शिबिरांद्वारे 4,361 युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे.

तसेच ‘ऑपरेशन रोशनी’ या विशेष मोहिमेद्वारे 9,971 पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, 1,412 नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांचा मोठा दिलासा मिळत आहे.

शहीद जवानांच्या बलिदानाची जनजागृती

या आरोग्य शिबिरादरम्यान फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना शहीद झालेल्या जवानांचे बलिदान, सी-60 जवानांचे शौर्य आणि पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. विविध माहितीपर बॅनरच्या माध्यमातून उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली.

सदर उपक्रम पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. श्री. सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. हर्षवर्धन बी. जे., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे ताडगावचे पोउपनि. कार्तिक दळवी व पोलीस अंमलदारांनी यशस्वीरित्या पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here