Home Breaking News माओवाद्यांचा गुप्त शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त !

माओवाद्यांचा गुप्त शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त !

0
11

गडचिरोली–नारायणपूर पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’मध्ये शस्त्रसाठा, आयईडी व निर्मिती साहित्य जप्त

गडचिरोली, दि. २८ मे : माओवादी चळवळीच्या उरलेल्या मुळांवर घाव घालत गडचिरोली पोलीस व नारायणपूर (छत्तीसगड) पोलिसांनी संयुक्त आंतरराज्यीय कारवाईत माओवाद्यांचा गुप्त शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त करण्यात मोठे यश मिळविले आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या या धाडसी मोहिमेत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, आयईडी स्फोटक आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले असून घटनास्थळीच अनेक साहित्य नष्ट करण्यात आले आहे.

‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत दिनांक २७ मे रोजी राबविण्यात आलेल्या या प्रभावी कारवाईत माओवाद्यांनी जंगल परिसरात जमिनीत गुप्तपणे लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा उघडकीस आला आहे. यात ०१ इन्सास रायफल, ०२ सिंगल शॉट रायफल, ०२ नग १२ बोअर रायफल आणि एकूण १८ जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात येत असली तरी सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्यासाठी माओवादी दुर्गम जंगल परिसरात शस्त्रे आणि स्फोटक साहित्य तयार करून गुप्तपणे जमिनीत लपवून ठेवत होते. नक्षल सप्ताह, निवडणुका आणि सुरक्षा दलांच्या हालचालींवेळी या साहित्याचा वापर करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

आत्मसमर्पित माओवाद्यांच्या सखोल चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टे काकूर, जि. नारायणपूर (छ.ग.) पासून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील जंगलात शस्त्रनिर्मितीचा गुप्त अड्डा सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानुसार दि. २६ मे रोजी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष संयुक्त शोधमोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत विशेष अभियान पथक प्राणहिता येथील ०४ तुकड्या, डीआरजी नारायणपूरचे ०१ पथक आणि बीडीडीएस प्राणहिताचे ०२ पथक सहभागी झाले होते. दि. २७ मे रोजी जंगल परिसरात कसून शोधमोहीम राबविताना बिडीडीएस पथकाला मोठा शस्त्रसाठा आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य सापडले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी २५ किलो आयईडी स्फोटक, ०२ क्लेमोर, ११० डेटोनेटर, कॉर्टेक्स वायर, ५०० पेक्षा अधिक बीजीएल सेल, बीजीएल सेल तयार करण्याचे साहित्य, ०७ बीजीएल लाँचर, ०३ ट्यूब लाँचर, लोखंडी सळ्या, ०२ लेथ मशीन, ०२ मोटार, ग्राइंडर मशीन, इन्व्हर्टर, बॅटरी, वायर बंडल, सोलर प्लेट आदी साहित्य जप्त केले. घटनास्थळी मिळालेल्या अनेक माओवादी साहित्याचा जवानांनी जागीच नाश केला.

ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. हर्षवर्धन बी. जे., पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे आणि नारायणपूरचे पोलीस उपअधीक्षक श्री. मनोज मंडावी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.

माओवाद्यांना मोठा धक्का

गडचिरोली–छत्तीसगड सीमेवरील दुर्गम जंगल परिसरात सुरू असलेल्या या प्रभावी कारवायांमुळे माओवाद्यांच्या हालचालींना मोठा फटका बसला असून, त्यांच्या शस्त्रपुरवठा साखळीवर मोठा आघात झाला आहे. सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here