![]()
अंतिम सामन्यात तोडसा ट्रॉफी फायटर्सवर 3 धावांनी मात; एटापल्ली परिसरातील ग्रामीण क्रिकेट प्रतिभेला मोठे व्यासपीठ
गडचिरोली, : हेड्री येथील लॉयड्स स्पोर्ट्स ग्राउंडवर आयोजित लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग (LVPL) 2026 स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात भव्य समारोप झाला. एटापल्ली परिसरातील ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेत खेळाडू, प्रेक्षक आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. क्रीडाभावना, एकता आणि ग्रामीण प्रतिभेला चालना देणारी ही स्पर्धा यशस्वी ठरली.
स्पर्धेचे उद्घाटन 5 मे 2026 रोजी भव्य कार्यक्रमाने करण्यात आले असून, 7 मेपासून अधिकृत सामने सुरू झाले होते. तर 15 मे रोजी रंगलेल्या अंतिम सामन्यात बीसीसीसी आलदांडी संघाने टोडसा ट्रॉफी फायटर्स संघाचा अवघ्या 3 धावांनी पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा देताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी सांगितले की, “स्थानिक युवकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळून नवोदित प्रतिभांचा शोध लागण्यास मदत होईल.”
स्पर्धेतील विजेता बीसीसीसी आलदांडी संघाला 75 हजार रुपये रोख व चषक, तर उपविजेता टोडसा ट्रॉफी फायटर्सला 50 हजार रुपये प्रदान करण्यात आले. हेड्री हरिकेन्सने तिसरे स्थान पटकावत 30 हजार रुपये, तर नेंदर इलेव्हन हिरोज संघाने चौथे स्थान मिळवत 20 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या संघांनाही प्रत्येकी 10 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.
वैयक्तिक पुरस्कारांमध्ये हेड्री हरिकेन्सचा प्रसनजित सरकार याला ‘मॅन ऑफ द सिरीज’ घोषित करून 10 हजार रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. तसेच बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर, बेस्ट विकेटकीपर, बेस्ट ऑलराउंडर, बेस्ट यंग प्लेअर आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी 3 हजार रुपये रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावातील मान्यवर, पोलीस प्रशासन, स्वयंसेवक, CSR विभाग, लॉयड्सचे विविध विभाग आणि ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले.