![]()
400 पैकी 342 गुणांची नेमबाजी; आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या मदतीने मिळाला उच्च प्रतीचा पिस्तोल, परिसरात अभिमानाचे वातावरण
गडचिरोली : गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आलापल्ली येथील कु. अनन्या अविनाश सामलवार हिने राज्यस्तरीय महाराष्ट्र एअर पिस्तोल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. मुंबई येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत तिने 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात 400 पैकी तब्बल 342 गुण मिळवत जूनमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. तिच्या या यशामुळे आलापल्लीसह संपूर्ण परिसरात आनंद, कौतुक आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनन्या सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील त्रिमूर्ती सैनिक शाळेत दहावीत शिक्षण घेत असून सातवीपासून ती या संस्थेत शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच नेमबाजीविषयी विशेष आकर्षण असलेल्या अनन्याने कठोर मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तिच्या कुटुंबीयांनी तिच्या आवडीला दिलेले प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच ती आज राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे.
शाळेचे शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि शिक्षकांचे मार्गदर्शनही तिच्या यशामागील मोठा आधार ठरला आहे. संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुमीती गाडगे पाटील, उपाध्यक्ष स्नेहल, सहसचिव श्रुती आमले पाटील, प्राचार्य अरविंद देशमुख तसेच क्रीडाशिक्षक छबुराव काळे यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे अनन्याच्या क्षमतेला योग्य दिशा मिळाली. त्यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळेच अनन्याने राज्य स्तरावर दमदार कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेचे तिकीट निश्चित केले.
विशेष म्हणजे, अल्पसाधन असलेल्या कुटुंबातील या विद्यार्थिनीने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर मोठे स्वप्न साकार करण्याचा मार्ग निवडला आहे. तिच्या या यशाने ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या मदतीचा मोठा हातभार
अनन्याच्या यशामध्ये आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रोत्साहनाचा आणि मदतीचाही महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी अहेरी येथे झालेल्या भेटीदरम्यान आमदारांनी अनन्याच्या क्रीडा गुणवत्तेची दखल घेत तिला उच्च प्रतीचा एअर पिस्तोल उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक मदत केली. या आधुनिक साधनांमुळे तिच्या सरावाला अधिक चालना मिळाली आणि स्पर्धेतील तयारी अधिक मजबूत झाली.
अनन्यानेही आमदारांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “त्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि मदत माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली,” असे सांगितले. आता सर्वांच्या नजरा जूनमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकडे लागल्या असून, अनन्या आपल्या नेमबाजीच्या अचूकतेने आणखी एक यशस्वी टप्पा पार करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.