Home Breaking News “विदर्भात 547 किमीच्या नव्या महामार्गांना मंजुरी; पण आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353 सीचे...

“विदर्भात 547 किमीच्या नव्या महामार्गांना मंजुरी; पण आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353 सीचे काम पाच वर्षांपासून रखडले!”

0
23

नवे महामार्ग 2028 पर्यंत सुसाट धावणार; मात्र गडचिरोलीतील 99 किमी रस्त्याचे काम ‘थंडबस्त्यात’, प्रवाशांमध्ये संताप

गडचिरोली : विदर्भातील प्रवाशांसाठी राज्य सरकारने 547 किलोमीटर लांबीच्या चार महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देत मोठी घोषणा केली असली, तरी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी चे रखडलेले काम पुन्हा चर्चेत आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून केवळ 99 किलोमीटर रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून अनेक ठिकाणी थंडबस्त्यात पडल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

राज्य सरकारने नागपूर–चंद्रपूर, नागपूर–गोंदिया, भंडारा–गडचिरोली आणि नवेगाव–सुरजागड या चार महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली असून, 2028 पर्यंत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकूण 51 हजार 906 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या महामार्गांमुळे विदर्भातील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे.

मात्र, दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353 सीचा प्रश्न अद्यापही कायम आहे. रस्त्याच्या कामामध्ये अनेक ठिकाणी अनियमितता, निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी अनेकदा निवेदने आणि तक्रारी करूनही या कामाला अपेक्षित गती मिळाली नसल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना रस्त्याचे अपूर्ण काम प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात खड्डे, चिखल आणि वाहतुकीच्या समस्येमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे “गडचिरोलीतील प्रवाशांचा प्रवास सुसाट कधी होणार?” असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.

माहितीनुसार, दि. 13 मे 2026 रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या चार नव्या महामार्गांना मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) हे प्रकल्प उभारले जाणार असून सप्टेंबर ते डिसेंबर 2028 पर्यंत ते वाहतुकीस खुले करण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीतच राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि बांधकाम यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353 सीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

महामार्ग प्रकल्पांची झलक :

➡️ नागपूर–चंद्रपूर महामार्ग – 204.79 किमी, 9 तालुके जोडणार

➡️ नागपूर–गोंदिया महामार्ग – विदर्भातील संपर्काला गती

➡️ भंडारा–गडचिरोली महामार्ग – औद्योगिक व ग्रामीण भागाला जोडणी

➡️ नवेगाव–सुरजागड महामार्ग – विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

आता प्रश्न एकचविदर्भात नवे महामार्ग सुसाट धावणार, पण आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353 सीवरील प्रवाशांचा खडतर प्रवास कधी संपणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here