Home Breaking News ‘जनतेच्या दारी महसूल प्रशासन’ : आलापल्लीत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराची...

‘जनतेच्या दारी महसूल प्रशासन’ : आलापल्लीत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराची सांगता; शेकडो नागरिकांना तात्काळ सेवांचा लाभ

0
32

सनद वाटप, पट्टेवाटप, 7/12 उतारे, दाखले, तक्रार निवारणासह विविध योजनांचा लाभ; महिला घरखरेदीदार व शेतकऱ्यांसाठी मुद्रांक शुल्क सवलतींची माहिती

गडचिरोली : अहेरी तहसील कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ चा सहावा टप्पा शुक्रवार (दि. १५ मे २०२६) रोजी मौजा आलापल्ली येथे उत्साहात पार पडला. लोकाभिमुख प्रशासन, तात्काळ सेवा वितरण आणि महसूल विषयक प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाच्या अंतिम शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अहेरी शुभम पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, नायब तहसीलदार नरेंद्र दाते, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अहेरी रणदिवे, तालुका कृषी अधिकारी निखिल गुरव, दुय्यम निबंधक अहेरी आर. जी. चिलनकर, पंचायत समिती अहेरीचे गटविकास अधिकारी गणेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

महसूल सेवांचा ‘सिंगल विंडो’ लाभ

या भव्य शिबिरात नागरिकांना एकाच छताखाली महसूल विभागाच्या १५ हून अधिक सेवांचा लाभ देण्यात आला. प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, ७/१२ व ८-अ उताऱ्यांतील दुरुस्ती, QR कोडयुक्त डिजिटल ७/१२ उतारे वितरण, उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे, सामाजिक अर्थसहाय्य मंजुरी आदेश वाटप, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत प्रकरणांचा निपटारा यांसारख्या सेवांवर विशेष भर देण्यात आला.

यासोबतच डिजिटल सेवा प्रभावीपणे राबविणे, Single Day Service Delivery प्रणाली, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान सेवा, शेतरस्ते, शिवरस्ते व पाणंद रस्त्यांबाबत तक्रार निवारण, घरांसाठी पट्टेवाटप, डिजीटल राशन कार्ड, जन्म-मृत्यू नोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती, एसटी स्मार्टकार्ड आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

भूमी अभिलेख विभागाकडून सनद वाटप

उप विभागीय भूमी अभिलेख कार्यालय अहेरीच्या माध्यमातून स्वामित्व योजनेंतर्गत विविध गावांमध्ये सनद वाटप करण्यात आले. मौजा वेलगूर टोला येथे २ सनद वाटप करून ₹२,७२२, मौजा येलचिल येथे ३ सनद वाटप करून ₹७,८६८, तर मौजा चौडमपल्ली येथे २३ सनद वाटप करून ₹३५,६०८ इतकी सनद फी वसूल करण्यात आली. एकूण ₹४६,१९८ महसूल जमा झाला. तसेच मौजा आलापल्ली येथे ३ पट्टेवाटप करण्यात आले असून महसूल व वन विभागाच्या पोटहिस्सा मोजणीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

महिला व शेतकऱ्यांसाठी शासनाची विशेष सवलत

दुय्यम निबंधक कार्यालय अहेरीमार्फत शिबिरात नागरिकांना विविध मुद्रांक शुल्क व नोंदणी सवलतींबाबत माहिती देण्यात आली. महिलांनी घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्का सूट, तर दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी पीक कर्जासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कात माफी देण्यात येत असल्याची माहिती सह दुय्यम निबंधक आर. जी. चिलनकर यांनी दिली.

याशिवाय सलोखा योजना अंतर्गत शेतजमिनीच्या अदलाबदली दस्तऐवजासाठी केवळ ₹१००० मुद्रांक शुल्क व ₹१००० नोंदणी फी, कौटुंबिक बक्षीसपत्रासाठी केवळ ₹२०० मुद्रांक शुल्क, तसेच शैक्षणिक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफीसारख्या शासनाच्या महत्त्वाच्या योजनांची माहितीही देण्यात आली.

विविध विभागांचे स्टॉल; नागरिकांना मोठा लाभ

या शिबिरात महसूल, नोंदणी व मुद्रांक विभागासह विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला. आधार केंद्र, सेतू सुविधा केंद्र, आरटीओ, बँक व इतर विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. यामुळे नागरिकांना अनेक दाखल्यांचे तात्काळ वितरण करण्यात आले.

“पारदर्शक, लोकाभिमुख व शंभर टक्के प्रलंबित प्रकरणे निकाली काढणारे महसूल प्रशासन निर्माण करण्यावर या अभियानाचा मुख्य भर आहे,” असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here