![]()
रखडलेला नवीन कॅम्पस, वसतिगृहातील अस्वच्छता, निकृष्ट मेस व्यवस्था आणि निष्क्रिय प्रयोगशाळांवर प्रशासनाला जाब; विद्यार्थ्यांच्या हक्कांशी तडजोड सहन करणार नाही, नरोटेंचा इशारा
गडचिरोली : जिल्ह्याच्या सर्वोच्च शैक्षणिक केंद्राची ओळख असलेल्या गोंडवाना विद्यापीठ येथे प्रशासकीय दिरंगाई, रखडलेले विकास प्रकल्प आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांची बिकट अवस्था पाहून आमदार तथा सिनेट सदस्य डॉ. मिलिंद नरोटे यांनी विद्यापीठ प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रस्तावित नवीन कॅम्पसचे बांधकाम निधी उपलब्ध असूनही रखडल्याबाबत तसेच विविध शैक्षणिक योजना प्रभावीपणे का राबवल्या जात नाहीत, याचा जाब घेत त्यांनी प्र. कुलगुरू श्रीराम कावळे यांच्यासमवेत सविस्तर चर्चा केली.
विद्यापीठाच्या पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील अस्वच्छता, मेसमधील निकृष्ट दर्जाची व्यवस्था आणि प्रयोगशाळांमध्ये आवश्यक साहित्याच्या कमतरतेमुळे संतप्त झालेल्या नरोटे यांनी प्रशासनाला कडक शब्दांत सुनावले. विद्यार्थ्यांच्या हक्काचा पैसा आणि वेळ वाया घालवण्याचा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
“विद्यापीठ हे शिक्षणाचे केंद्र असावे, इव्हेंटबाजीचे नव्हे”
पंतप्रधान उच्च शिक्षण अभियान योजनेच्या अंमलबजावणीत प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत नरोटे यांनी विद्यापीठातील विविध कार्यक्रमांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याची टीका केली. “विद्यापीठ हे केवळ इव्हेंटबाजीचे केंद्र नसून शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि विद्यार्थीकेंद्रित व्यवस्थेचे आदर्श उदाहरण असले पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला फटकारले. केवळ पदव्या वाटण्यापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मेसच्या स्वयंपाकगृहात आढळली धक्कादायक अस्वच्छता
मुलांच्या वसतिगृहाच्या पाहणीवेळी विद्यार्थ्यांनी मेसमधील निकृष्ट जेवण, अस्वच्छ स्वयंपाकगृह आणि दुर्लक्षित देखभालीबाबत तक्रारींचा पाढाच वाचला. त्यानंतर नरोटे यांनी स्वयंपाकगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली असता उघड्यावर फेकलेले अन्न, गंजलेली भांडी आणि सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी असा खेळ कसा केला जाऊ शकतो, असा सवाल उपस्थित करत त्यांनी तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
प्रयोगशाळांची अवस्था चिंताजनक; विद्यार्थ्यांची घटती नोंदणीही चिंतेचा विषय
विद्यापीठातील विविध विभागांच्या प्रयोगशाळांमध्ये आवश्यक साहित्याची कमतरता आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या अभावामुळे अनेक प्रयोगशाळा निष्क्रिय होण्याच्या मार्गावर असल्याची बाबही पाहणीतून समोर आली. विद्यार्थ्यांची घटती नोंदणी आणि शैक्षणिक गुणवत्तेचा घसरता आलेख प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याची टीका नरोटे यांनी केली.
दरम्यान, विद्यापीठ संचलित आदर्श पदवी महाविद्यालयालाही त्यांनी सदिच्छा भेट देत ‘इको-फॉरेस्ट’ आणि ‘बीएससी डेटा सायन्स’सारख्या आधुनिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बदलत्या काळात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात सक्षम करणे काळाची गरज असल्याचे सांगत, दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या पाहणीवेळी भाजपा प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खट्टी, कुलसचिव अनिल हिरेकन, सिनेट सदस्य सतीश चिचघरे, रुपेंद्र गौर, स्वरूप तारगे आणि अरुण प्रकाश उपस्थित होते.