Home Breaking News पोलीस भरती उमेदवारांची अडवणूक थांबवा; जिल्हा रुग्णालय प्रशासनाला आमदार नरोटे यांचा सज्जड...

पोलीस भरती उमेदवारांची अडवणूक थांबवा; जिल्हा रुग्णालय प्रशासनाला आमदार नरोटे यांचा सज्जड दम

0
38

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी १२ दिवसांची हेलपाटेगिरी उघड; रुग्णांच्या आहाराच्या दर्जावरही व्यक्त नाराजी

गडचिरोली | जिल्हा सामान्य रुग्णालयातील गैरव्यवस्था, पोलीस भरतीसाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविताना उमेदवारांना होत असलेला विलंब आणि रुग्णांच्या आहाराच्या दर्जाबाबत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सोमवारी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान पोलीस भरतीतील उमेदवारांना तब्बल १२ दिवसांपासून वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाला कठोर शब्दांत जाब विचारला.

आमदार नरोटे यांनीनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करत रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्वयंपाकगृहात जाऊन रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि आहार व्यवस्थेची प्रत्यक्ष तपासणी केली. रुग्णांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नसून आहार व्यवस्थेत हलगर्जीपणा आढळल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, पोलीस भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी अनेक उमेदवारांना दिवसन्‌दिवस रुग्णालयात ताटकळत उभे राहावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली. उमेदवारांना सकाळपासून रात्रीपर्यंत रुग्णालयात थांबवून किरकोळ कारणांवर पुन्हा-पुन्हा चाचण्या करण्यास सांगितले जात असल्याने युवकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

ग्रामीण भागातील गरीब व कष्टकरी युवक पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करत असताना प्रशासकीय दिरंगाईमुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याबद्दल आमदार नरोटे यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लहाडे यांना थेट जाब विचारत, “जाणीवपूर्वक टाळाटाळ करून युवकांना वेठीस धरण्याचा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. तसेच, प्रलंबित वैद्यकीय प्रमाणपत्रांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

या पाहणीवेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर यांच्यासह डॉ. भारत खटी, डॉ. उईके, डॉ. गेडाम, डॉ. पेंदाम आणि डॉ. दुर्वे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here