![]()
कधी हॉटेलमध्ये वेटर, तर कधी पानटपरी चालवत शिक्षण; तिसऱ्या प्रयत्नात MPSC जिंकून समय्या मोगलीवार बनले पोलीस उपनिरीक्षक
मोहसीन शेख | प्रतिनिधी, जिमलगट्टा
गडचिरोली : गरिबी, संघर्ष आणि अपयशाच्या अनेक वादळांवर मात करत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यशाचं शिखर गाठणाऱ्या अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील शेतकरी पुत्र समय्या मलय्या मोगलीवार यांनी प्रेरणादायी यशाची गाथा लिहिली आहे. एकेकाळी वर्तमानपत्र वाटणारा, हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा आणि शिक्षणासाठी पानटपरी चालवणारा हा युवक आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर विराजमान झाला आहे. त्यांच्या या यशाने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याची मान उंचावली आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जन्मलेल्या समय्या यांचे प्राथमिक शिक्षण जिमलगट्टा येथील शासकीय आश्रमशाळेत झाले. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शिक्षणासोबत संघर्ष हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग ठरला. २००४ पर्यंत त्यांनी ‘लोकमत’ वर्तमानपत्र घरोघरी पोहोचविण्याचे काम केले. पेपर वाटताना त्यातील प्रेरणादायी बातम्या आणि अधिकारी वर्गाच्या यशोगाथा वाचून त्यांच्या मनात अधिकारी होण्याचं स्वप्न अंकुरलं.
केवळ पेपर विक्रीच नव्हे, तर शिक्षणासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम केले. बारावीत असताना पानटपरी चालवून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलला. उच्च शिक्षणासाठी अहेरी गाठल्यानंतर २००६ ते २०१२ या काळात जनरल स्टोअरमध्ये अर्धवेळ काम करत त्यांनी बी.ए. आणि एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले.
दरम्यान, २००८ आणि २०१० च्या पोलीस भरतीत अपयश आले, तरीही समय्या खचले नाहीत. २०१२ मध्ये गडचिरोली पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाल्यानंतर त्यांनी नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भागात सेवा बजावत असतानाही अभ्यासाची कास सोडली नाही. देचलीपेठा, रेगुंठा आणि मरपल्लीसारख्या भागात कठीण ड्युटी, पेट्रोलिंग आणि बंदोबस्त सांभाळत त्यांनी अधिकारी बनण्याचं स्वप्न जिवंत ठेवलं.
PSI पदाचा प्रवासही खडतर होता. २०१७ आणि २०२२ मध्ये पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही शारीरिक चाचणीत कमी गुणांमुळे संधी हुकली. मात्र, सलग दोन अपयशानंतरही त्यांनी हार मानली नाही. अखेर २०२३ च्या परीक्षेत लेखी परीक्षेत २६७ गुण आणि शारीरिक चाचणीत ८९ गुण मिळवत राज्यात ४३५ वा क्रमांक पटकावून PSI पदाला गवसणी घातली.
आपल्या यशाचं श्रेय देताना समय्या म्हणाले, “आई-वडील, भाऊ, पत्नी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले. प्रतिकूल परिस्थितीने मला अधिक मजबूत बनवलं.”
पेपर विक्रेत्यापासून पोलीस उपनिरीक्षकापर्यंतचा समय्या मोगलीवार यांचा संघर्षमय प्रवास आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ‘स्वप्न मोठं असेल तर परिस्थिती अडथळा ठरत नाही’ हा संदेश त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दिला आहे.