![]()
शहीद जवानांचे बलिदान, सी-६०च्या शौर्याचीही जनजागृती; तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व मार्गदर्शन
गडचिरोली | गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने मौजा गट्टा (जां.) येथील आठवडी बाजार परिसरात रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या अभिनव उपक्रमांतर्गत तब्बल ६५ नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली असून आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचारही करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दल, पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात नागरिकांना विविध आजारांबाबत तपासणीसह आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचा उद्देश दुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हा होता.
शिबिरामध्ये सी.आर.पी.एफ. पोलीस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक नारायण, डॉ. गणेश चिचघरे, डॉ. श्रेया कुमरे तसेच परिचारिकांनी नागरिकांची तपासणी केली. तपासणीनंतर सुमारे १० नागरिकांना पुढील उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले. महिलांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून विशेष तपासणी व आरोग्य मार्गदर्शनही करण्यात आले.
यावेळी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आठवडी बाजारात उपस्थित नागरिकांना शहीद जवानांचे बलिदान, सी-६० जवानांचे शौर्य आणि पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती फिरत्या प्रदर्शनी व बॅनरच्या माध्यमातून देण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दल जागरूकता निर्माण करण्यास मदत झाली.
विशेष म्हणजे, गडचिरोली पोलीस दलाने सन २०२१ पासून आतापर्यंत १९८ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून ४२ हजार ५०० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. तसेच ५ रक्तदान शिबिरांतून ४,३६१ युनिट रक्त संकलित करण्यात आले असून ऑपरेशन रोशनी अंतर्गत ९,९७१ नागरिकांची नेत्र तपासणी आणि १,४१२ नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
सदर आरोग्य शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक एम. रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सीआरपीएफ ११३ बटालियनचे कमांडंट जसवीर सिंग, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी., पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.