![]()
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा प्रशासनाला सज्जड इशारा; धानोरा ग्रामीण रुग्णालयातील त्रुटींवर घेतला कठोर आढावा
गडचिरोली | धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित सनियंत्रण व सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आरोग्य व्यवस्थेचा सखोल आढावा घेत प्रशासनाचे कान टोचले. रुग्णसेवेत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देत “आरोग्य सेवेतील निष्काळजीपणा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
बैठकीदरम्यान रुग्णालयातील विविध त्रुटी, अपुऱ्या सुविधा आणि उपचार प्रक्रियेतील अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे आमदार डॉ. नरोटे यांनी स्पष्ट केले.
ईसीजी तपासणीसंदर्भात बोलताना त्यांनी केवळ तांत्रिक यंत्रणेवर अवलंबून न राहता अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अचूक निदान करून रुग्णांना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले. तसेच पोस्ट मॉर्टम कक्षातील अपुऱ्या सुविधांकडे लक्ष वेधत आवश्यक सर्व सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.
गरोदर माता आणि अस्थिव्यंग रुग्णांना किरकोळ कारणांसाठी इतरत्र संदर्भित केले जात असल्याबाबत नाराजी व्यक्त करत, “गोरगरीब रुग्णांची आर्थिक व मानसिक ओढाताण थांबवण्यासाठी शक्य तेवढे उपचार स्थानिक पातळीवरच व्हावेत,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेताना त्यांनी धानोरा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाबाबत माहिती दिली. सध्या ६० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित निधीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षाताई लहाडे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. गजभिये, डॉ. भागराज दुर्वे, भाजप किसान प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजप प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे, ज्येष्ठ नेते अनंत साळवे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजप तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, भाजप जिल्हा सचिव सारंज साळवे, नगरसेवक संजय कुंडू, नगरसेविका सौ. भूमिताताई परचाके यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.