Home Breaking News “अंधारात अहेरीचा विकास?”

“अंधारात अहेरीचा विकास?”

0
29

करोडो खर्चूनही रस्त्यांवर उजेड नाही; सीसी रोड कामांवरही नागरिकांचा संताप, नगर पंचायत प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार

गडचिरोली : अहेरी नगर पंचायतच्या विकासकामांबाबत शहरात सध्या जोरदार चर्चा रंगली असून, रस्त्यांवरील दिवाबत्ती व्यवस्था आणि सीसी रोडच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “विकासाच्या नावाखाली फक्त निधी खर्च केला जातोय का?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत उघडपणे विचारला जात आहे.

नगर पंचायतमार्फत शहरातील विविध मुख्य मार्गांवर मोठ्या प्रमाणात स्ट्रीट लाईट बसविण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या दिव्यांचा प्रकाश थेट रस्त्यावर न पडता आकाशाकडे किंवा बाजूला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे रात्री वाहनचालक आणि पादचाऱ्यांना पुरेसा उजेड मिळत नसल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

काही नागरिकांनी उपरोधिक शब्दांत प्रतिक्रिया देताना, “नगर पंचायतने लावलेले दिवे इतके ‘पावरफुल’ आहेत की जुन्या काळातील कंदीलसुद्धा यापेक्षा जास्त उजेड देत होते,” अशी टोलेबाजी केली. करोडो रुपयांचा निधी खर्च करूनही प्रत्यक्षात नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरील “अहेरी नगर पंचायत विकास ग्रुप” मध्ये या विषयावर दररोज जोरदार चर्चा होत असून, नागरिकांकडून फोटो आणि व्हिडिओ शेअर करून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली केवळ दिखाऊ कामे केली जात असून प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, शहरातील विविध वार्डांमध्ये करण्यात आलेल्या सीसी रोडच्या कामांवरही गंभीर आरोप होत आहेत. काही भागांमध्ये काम पूर्ण होऊन अवघे आठ-दहा दिवस होत नाहीत तोच रस्त्यांना तडे जाऊ लागल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करत नागरिकांनी या कामांची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

“करदात्यांच्या पैशातून होत असलेल्या विकासकामांचा दर्जा इतका निकृष्ट असेल तर संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली. तसेच संपूर्ण कामांची स्वतंत्र तांत्रिक समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान, या सर्व आरोपांबाबत अहेरी नगर पंचायत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिक आता वरिष्ठ प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात लक्ष घालून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here