![]()
भंगारामपेठ्यात ‘सल्ला गागर’ अनावरण व सामूहिक विवाह सोहळा जल्लोषात; आदिवासी संस्कृतीचा ठसा उमटला
गडचिरोली : तालुक्यातील भंगारामपेठा येथे सामाजिक ऐक्य, परंपरा आणि संस्कृतीचा संगम घडवणारा ‘सल्ला गागर’ अनावरण व सामूहिक विवाह सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. स्व. विठ्ठल गंगा आलम यांच्या पाठांगणात आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘सल्ला गागर’चे अनावरण करून त्यांनी आदिवासी समाजातील गोटूल परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. अशा सामूहिक उपक्रमांमुळे समाजातील एकात्मता अधिक बळकट होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेला सामूहिक विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. अनेक नवदाम्पत्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. अनावश्यक खर्च टाळून साध्या, सुसंस्कृत पद्धतीने विवाह करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
नवदाम्पत्यांना डॉ. कंकडालवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गृहपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सुख, समृद्धी आणि समाजसेवेचा संदेश देत आशीर्वाद देण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव हनुमंतू मडावी, सरपंच किरण कोडापे, माजी सभापती भास्कर तलांडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष बालू बोगामी, माजी सरपंच अज्जु पठाण, उपाध्यक्ष विष्णु मडावी यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भंगारामपेठ्यातील या भव्य सोहळ्याने तालुक्यात चर्चेचा विषय ठरत सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक जतनाचा प्रभावी संदेश दिला आहे.