Home Breaking News आलापल्ली वनपरिक्षेत्रातील कामांवर चौकशीची प्रक्रिया वेगात; तक्रारदारास ६ मे रोजी सुनावणीस हजर...

आलापल्ली वनपरिक्षेत्रातील कामांवर चौकशीची प्रक्रिया वेगात; तक्रारदारास ६ मे रोजी सुनावणीस हजर राहण्याचे आदेश

0
70

महा Express News Network इम्पॅक्ट :

गडचिरोली, :आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) यांच्या कार्यकाळात जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत झालेल्या कामांबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीची प्रक्रिया गतीमान केली आहे. याच अनुषंगाने तक्रारदार श्री. शंकर का. ढोलगे यांना चौकशी समितीसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा नियोजन समिती, गडचिरोली यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार, संबंधित प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद अतिरिक्त जिल्हाधिकारी, अहेरी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर तक्रार ही सहपालकमंत्री यांच्या आढावा बैठकीदरम्यान मांडण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशीची प्रक्रिया सुरू केली.

चौकशी समितीसमोर तक्रारदाराचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेण्यासाठी बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार, तक्रारदाराने सुनावणीस उपस्थित राहताना आपल्या तक्रारीसंदर्भातील सर्व मूळ कागदपत्रे, छायाचित्रे व इतर पुरावे सोबत आणणे बंधनकारक आहे. तसेच, ठरलेल्या वेळेत उपस्थित न राहिल्यास एकतर्फी कार्यवाही करून उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे अहवाल सादर करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या कारवाईमुळे आलापल्ली वनपरिक्षेत्रातील कामांबाबत पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, चौकशी अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here