Home Breaking News थॅलेसेमिया मुक्तीसाठी विवाहपूर्व तपासणी अपरिहार्य – डॉ. वर्षा लहाडे

थॅलेसेमिया मुक्तीसाठी विवाहपूर्व तपासणी अपरिहार्य – डॉ. वर्षा लहाडे

0
22

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘थॅलेसेमिया सप्ताह’ उत्साहात प्रारंभ; सामुदायिक शपथ ग्रहण

गडचिरोली,   “थॅलेसेमिया हा गंभीर अनुवांशिक आजार असला तरी योग्य जनजागृती, वेळेवर तपासणी आणि खबरदारीच्या उपाययोजनांद्वारे समाजाला या आजारातून मुक्त करता येऊ शकते. भविष्यात थॅलेसेमिया ग्रस्त (मेजर) बालकांचा जन्म टाळण्यासाठी युवक-युवतींनी विवाहपूर्व तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी केले.

जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे १ ते ८ मे २०२६ या कालावधीत आयोजित ‘थॅलेसेमिया सप्ताह’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या घोषवाक्याखाली राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा प्रारंभ सामुदायिक शपथग्रहणाने करण्यात आला.

या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, मार्गदर्शक डॉ. इंद्रजित नागदेवते, प्रमुख पाहुणे डॉ. बगराज धुर्वे, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. साखरे (BTO) तसेच डॉ. गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. इंद्रजित नागदेवते यांनी थॅलेसेमिया आजाराचे तांत्रिक स्वरूप, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. बगराज धुर्वे यांनी सांगितले की, “थॅलेसेमियाचे अचूक निदान करण्यासाठी HPLC चाचणी महत्त्वाची असून, रुग्णांनी नियमितपणे LFT, KFT, HB आणि CBC चाचण्या करून उपचार सुरू ठेवणे आवश्यक आहे.”

जिल्हा सिकलसेल समन्वयकांनी आठवडाभर राबविण्यात येणाऱ्या जनजागृती, तपासणी व मार्गदर्शन कार्यक्रमांची रुपरेषा सादर केली.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. वर्षा लहाडे यांनी १ ते ४० वयोगटातील सर्व नागरिकांनी थॅलेसेमिया तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करत “थॅलेसेमिया मुक्त जिल्हा” घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here