Home Breaking News गोंडवाना विद्यापीठात ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन सेंटरचा शुभारंभ ! परीक्षा प्रणाली आधुनिकीकरणाकडे निर्णायक...

गोंडवाना विद्यापीठात ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन सेंटरचा शुभारंभ ! परीक्षा प्रणाली आधुनिकीकरणाकडे निर्णायक पाऊल

0
20

 

परीक्षा प्रणाली आधुनिकीकरणाकडे निर्णायक पाऊल

गडचिरोली, २ मे २०२६ : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे परीक्षा प्रणाली अधिक सक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन सेंटरचा आज औपचारिक शुभारंभ करण्यात आला. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले.

या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, वित्त व लेखाधिकारी सी. ए. भास्कर पठारे, परीक्षा संचालक डॉ. धनराज पाटील, नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदाजी सातपुते तसेच सिनेट सदस्य प्रा. उत्तमचंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन प्रणालीमुळे उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनात आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर होणार असून, प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि अचूक होणार आहे. या प्रणालीमुळे मानवी त्रुटी कमी होऊन मूल्यमापनाची विश्वासार्हता वाढणार आहे. तसेच, मूल्यमापनाची गती वाढून निकाल वेळेत जाहीर करण्यास मदत होणार असल्याने विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे.

डिजिटल प्रक्रियेमुळे माहितीची सुरक्षितता अधिक मजबूत होणार असून, मूल्यमापनात एकसमानता राखली जाईल. कागदाच्या वापरात घट झाल्यामुळे हा उपक्रम पर्यावरणपूरक ठरणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या केंद्राचे मुख्य मूल्यांकन अधिकारी म्हणून डॉ. नंदकिशोर मेश्राम तर सह-मूल्यांकन अधिकारी म्हणून डॉ. कृष्णा कारू हे कार्यभार पाहणार आहेत.

बॉक्स

“डिजिटल परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण टप्पा” – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

“ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन सेंटरची स्थापना ही उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीची गुणवत्ता आणि विश्वासार्हता अधिक बळकट होईल,” असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here