उपाध्यक्षपदी खिळसागर नाकाडे, मानद सचिवपदी दिपक निंबेकर बिनविरोध
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध पार पडली असून अध्यक्षपदी सौ. ईशा प्रचित पोरेड्डीवार, उपाध्यक्षपदी खिळसागर यादवराव नाकाडे तर मानद सचिवपदी दिपक राजेश्वर निंबेकर यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे बँकेला नव्या नेतृत्वाची दिशा मिळाली आहे.
दि. १५ एप्रिल २०२६ रोजी बँकेच्या सभागृहात संचालकांची विशेष बैठक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश चंदेल यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिव या तिन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने तिन्ही पदाधिकारी बिनविरोध निवडून आल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर चंदेल यांच्या हस्ते निवड प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्षपदाचा मान ईशा पोरेड्डीवार यांना मिळाला आहे. त्या उच्चशिक्षित असून त्यांनी बी.एससी., एमबीए (मानव संसाधन) तसेच कंपनी सेक्रेटरी (CS) या क्षेत्रात शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमुळे बँकेच्या व्यवस्थापन, कायदेशीर अनुपालन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.
या निवडप्रसंगी ज्येष्ठ नेते अरविंद पोरेड्डीवार, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांच्यासह अनेक मान्यवर, नवनियुक्त व माजी संचालक उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. यावेळी उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
नव्या नेतृत्वामुळे बँकेच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.