![]()
गडचिरोली : आलापल्ली परिसरात महावितरण कंपनीचा गंभीर निष्काळजीपणा समोर आला असून, 33 केव्ही फिडरमधून स्पार्क होऊन मौल्यवान जंगलात आग लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकीकडे नैसर्गिक संपत्ती जळून खाक होत असताना, दुसरीकडे कार्यकारी अभियंत्याकडून जेवणाचे आमंत्रण देण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी आग लागली त्या परिसरात आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना पूर्णपणे करण्यात आलेल्या नव्हत्या. नियमानुसार फिनिशिंग वॉल परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि मोकळा ठेवणे आवश्यक असताना तसे करण्यात आले नाही. तसेच, विद्युत लाईनच्या आसपास झाडांची छाटणी (ट्री कटिंग) करणे बंधनकारक असतानाही याकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा संवेदनशील भागात 33 केव्ही सबस्टेशनचा स्वतंत्र (स्पेशल) फिडर काढणे आवश्यक होते. त्याचबरोबर 132 केव्ही लाईनमधून अहेरीच्या 33 केव्ही नेटवर्कद्वारे योग्य पद्धतीने वीजपुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र, नियम धाब्यावर बसवून थेट 33 केव्ही लाईनद्वारे पुरवठा करण्यात आल्यानेच ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
या प्रकारामुळे महावितरण कंपनीचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला असून, जंगलासह नागरिकांच्या सुरक्षेशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, एवढ्या गंभीर घटनेनंतरही संबंधित अधिकाऱ्यांकडून संवेदनशीलतेचा अभाव दिसून येत असून, जेवणाच्या आमंत्रणामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.