गडचिरोली : राज्यात पुढील चार ते पाच दिवस तीव्र उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला असून विदर्भात तापमानाने आधीच ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. “कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघातासारख्या आजारांचा धोका वाढतो, त्यामुळे नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी,” असे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढील उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे:
दुपारी १२ ते ४ या वेळेत विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन कामाचे वेळापत्रक बदलावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. तसेच बाहेर पडताना सुती कपडे, टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
“विदर्भातील माझ्या बांधवांसह राज्यातील सर्व नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची विशेष काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,” असे आवाहन डॉ. आत्राम यांनी केले आहे