Home Breaking News “उद्या पासून आलापल्लीत बेमुदत धरणे; वनविभागातील कथित भ्रष्टाचाराविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार”

“उद्या पासून आलापल्लीत बेमुदत धरणे; वनविभागातील कथित भ्रष्टाचाराविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार”

0
10

📍गडचिरोली : आलापल्ली येथील विभागीय वन कार्यालयासमोर उद्या, दिनांक 16 एप्रिल 2026 पासून वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

वनविभागातील कथित भ्रष्टाचार, मनमानी कारभार आणि दडपशाहीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत असून, प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.
वनपरिक्षेत्र अधिकारी  जी. जी. गणवीर यांच्या कार्यपद्धतीविरोधात कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, मंजूर विकासकामे अंदाजपत्रकीय रकमेच्या केवळ 25 ते 30 टक्क्यांत करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अन्यथा कामे करू नयेत, असा अप्रत्यक्ष आदेश दिला जात असल्याचेही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असून कामांच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत सन 2024 पासून आजपर्यंत झालेल्या विविध कामांमध्ये ठेकेदारांशी संगनमत करून आर्थिक लाभासाठी अनियमितता करण्यात आल्याचा आरोपही पुढे आला आहे. याशिवाय, मजुरांची मजुरी वरिष्ठ स्तरावरून प्राप्त होऊनही दोन ते तीन महिने थकवली जात असल्याचे गंभीर वास्तव कर्मचाऱ्यांनी मांडले आहे.

महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन, अश्लील भाषेचा वापर आणि मानसिक छळ यांसारखे आरोपही या प्रकरणात समोर आले असून, यामुळे विभागातील वातावरण तणावपूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये मजुरीची रक्कम खात्यात जमा केल्याचे दाखवून प्रत्यक्षात RTGS व्यवहारांत अफरातफर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या सर्व बाबींवर सखोल चौकशी होऊन अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी “न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार” असा ठाम इशारा दिला आहे.

दरम्यान, 16 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या बेमुदत आंदोलनामुळे वनविभागाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here