![]()
जागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅली; अंधश्रद्धेविरुद्ध विज्ञानाची हाक
गडचिरोली, दि. ७ : “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी!” या ब्रीदवाक्याखाली गडचिरोली जिल्ह्यात जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सामान्य रुग्णालयातून निघालेल्या भव्य जनजागृती रॅलीत अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, कर्मचारी तसेच दुर्गम भागातील पारंपरिक वैद्य आणि पुजाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते दुर्गम भागातील वैद्य व पुजाऱ्यांचा पुढाकार. जीवन पुंगाटी, रामा कुले, रामजी कुलेटी, डोलू तिम्मा आणि तोडसा पेठा परिसरातील प्रतिनिधींनी अघोरी उपायांऐवजी शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन करत समाजाला विज्ञानाधारित आरोग्यसेवेचा संदेश दिला. “वेळेत उपचार घ्या, अंधश्रद्धा टाळा,” असा ठाम संदेश देत त्यांनी ‘आरोग्य दूत’ म्हणून भूमिका स्वीकारली.
कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” हा लोकसहभागाचा मंत्र देत आरोग्य ही लोकचळवळ बनवण्यावर भर दिला. नागरिकांनी सजग राहून प्रशासनाला सहकार्य केल्यास जिल्हा आरोग्य निर्देशांकात गडचिरोली अव्वल ठरू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी पारंपरिक वैद्य व पुजाऱ्यांना ‘आरोग्य दूत’ म्हणून जोडण्याचा अभिनव दृष्टिकोन मांडला. ग्रामीण भागातील सामाजिक प्रभाव लक्षात घेता त्यांच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती अधिक प्रभावी होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांवर भर देत लसीकरण, स्वच्छता आणि पोषक आहाराचे महत्त्व पटवून दिले. “आजार होण्यापूर्वीच त्याला थांबवणे हीच खरी आरोग्यसुरक्षा,” असे सांगत त्यांनी विज्ञानाधारित दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात वैद्य व पुजाऱ्यांना आरोग्यविषयक माहिती पुस्तिका देण्यात आल्या आणि उपस्थितांनी विज्ञानाची कास धरण्याची सामूहिक शपथ घेतली. लोकसहभागातून उभारलेली ही आरोग्य चळवळ दुर्गम भागात आधुनिक आरोग्य सेवांचा प्रसार अधिक प्रभावी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास विविध वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश खोरगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल कंकनालवार यांनी मानले.
लोकसहभाग, विज्ञान आणि जनजागृती यांच्या संगमातून गडचिरोलीत आरोग्य चळवळीला नवे बळ मिळत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.