“विद्यार्थिनींना आरोग्य, स्वच्छता व HPV लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले”
गडचिरोली : दि. ७ एप्रिल २०२६ : जागतिक आरोग्य दिनानिमित्त इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व भगवंतराव हायस्कूल येथे आयोजित जनजागृती कार्यक्रम उत्साहात व मोठ्या प्रतिसादात पार पडला. विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित या उपक्रमाला शिक्षक, वैद्यकीय अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. बाईचवदार सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. लुबना हकीम, श्री. अब्दुल सर (कैवल्य फाउंडेशन), श्री. कोसर (पं. स. अहेरी) तसेच कु. सुरभी शिल्पकार उपस्थित होते.
याच अनुषंगाने भगवंतराव हायस्कूलमध्येही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक विलास गहुकर सर यांच्या विशेष सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
प्राथमिक आरोग्य केंद्र, महागाव यांच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना मासिक पाळीतील स्वच्छता, किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि HPV लसीकरणाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास योनी संक्रमण, मूत्रमार्ग संक्रमण (UTI), त्वचारोग यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो, याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना सजग केले.
तसेच HPV लसीकरणामुळे भविष्यात गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळू शकते, हेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थिनींना शिक्षणावर भर देणे, स्वावलंबी बनणे आणि अल्पवयीन विवाह टाळणे यासंदर्भात प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमासाठी ANM छाया मडावी (सिस्टर) व आशा कार्यकर्त्या पुष्पा आत्राम यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त घेतलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे.