‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे सरकारला साकडे
📍 गडचिरोली | लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या वृत्तपत्र उद्योगावर सध्या गंभीर आर्थिक संकट ओढवले असून, वाढत्या महागाईमुळे हा उद्योग अस्तित्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. कागद, वीज आणि मुद्रण साहित्याच्या दरात तब्बल १५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने विशेषतः लघु व मध्यम वृत्तपत्रांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
या पार्श्वभूमीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने ६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २०१९ पासून वृत्तपत्र निर्मितीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असताना शासकीय जाहिरात दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. परिणामी, अनेक लघु व मध्यम वृत्तपत्रे आर्थिक अडचणीत सापडून बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :
• शासकीय जाहिरात दरात किमान १५० टक्के वाढ करावी
• जाहिरातींची बिले ३० दिवसांच्या आत अदा करावीत, विलंब झाल्यास व्याज द्यावे
• लघु व मध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वाटपात समान संधी मिळावी
• १० वर्षे सेवा असलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती (Accreditation) द्यावी
• २० वर्षे सेवा व ५५ वर्षे पूर्ण झालेल्या पत्रकारांना पेन्शन योजना लागू करावी
• सर्व शासकीय ई-टेंडर आणि जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करण्याची सक्ती करावी
यावेळी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार, राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद जोशी, रेखा वंजारी, संगीता विजयकर, तिलोत्तमा हाजरा, प्रकाश ताकसांडे, सुरज हजारे, निलेश सातपुते व हितेश ठेंगे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी “वृत्तपत्र उद्योग मजबूत राहिला तरच लोकशाही व नागरिकांचे अधिकार सुरक्षित राहतील,” अशी ठाम भावना व्यक्त केली.
दरम्यान, या गंभीर परिस्थितीत राज्य सरकार वृत्तपत्र उद्योगाला कोणता दिलासा देणार, याकडे संपूर्ण माध्यम क्षेत्राचे लक्ष लागले आहे.