Home Breaking News “महामार्गावर ‘वाघराज’चा थरार! गडचिरोली-आरमोरी मार्गावर मुक्त संचाराने नागरिक दहशतीत”

“महामार्गावर ‘वाघराज’चा थरार! गडचिरोली-आरमोरी मार्गावर मुक्त संचाराने नागरिक दहशतीत”

0
40

File photo by AI… महा Express news netwark….

गडचिरोली : जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, आता हा संघर्ष थेट राष्ट्रीय महामार्गावर येऊन ठेपला आहे.

गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दुपारी वाघाचा मुक्त संचार पाहायला मिळाल्याने नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

महामार्गावरील प्रसिद्ध बाबा फरीद दर्गा परिसरात वाघ रस्त्यालगत वावरताना दिसून आला. वाघ अगदी रस्त्याच्या जवळ असल्याने अनेक वाहनचालकांनी आपली वाहने दूरवरच थांबवली. काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेमुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. काहींनी या थरारक क्षणांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले, तर अनेकांनी भीतीपोटी घटनास्थळ टाळले.

दरम्यान, याच वाघाने परिसरात एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे नागरिकांची भीती आणखी वाढली आहे.

याच दिवशी सकाळी गडचिरोली तालुक्यातील चांभार्डा शिवारातही वाघाचे दर्शन झाले. मोहफूल संकलनासाठी गेलेल्या नागरिकांसमोर अचानक वाघ आल्याने मोठी धावपळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

सध्या जिल्ह्यात मोहफूल संकलनाचा हंगाम सुरू असल्याने अनेक नागरिक पहाटेच्या अंधारात जंगल आणि शेतशिवारात जात आहेत. अशा परिस्थितीत वाघाचा वावर मानवी वस्ती आणि महामार्गाजवळ असल्याने धोका अधिकच वाढला आहे.

वनविभागाच्या माहितीनुसार, सदर वाघाचा संचार वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाट परिसरात असल्याची शक्यता आहे. नागरिकांनी या भागात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अंधारात एकटे जंगलात जाणे टाळावे, समूहानेच हालचाल करावी, असे आवाहन केले आहे.

वाघाच्या सततच्या दर्शनामुळे गडचिरोलीकरांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, वनविभागाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here