मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते उद्घाटन; युवकांना क्रीडेमुळे शिस्त व एकजुटीचा संदेश
महा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
आरमोरी (दि. २१ मार्च २०२६) :आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथे युवा क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित देऊळगाव चषक रात्रीकालीन हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा भव्य आणि उत्साहपूर्ण शुभारंभ नुकताच पार पडला. “एक गाव, एक संघ” या अभिनव संकल्पनेवर आधारित या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. नेते यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणताही खेळ युवकांमध्ये शिस्त, संघभावना आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि निरोगी जीवनशैलीला चालना मिळते. पंचांचा निर्णय अंतिम मानून खेळ खेळल्यास स्पर्धा अधिक आनंददायी वातावरणात पार पडते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी गावातील विविध समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे, भाजप जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, तालुका अध्यक्ष पंकजजी खरवडे, सरपंच शामादेवी सहारे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष राहुल नेवारे व त्यांच्या सहकाऱ्यांसह क्रीडाप्रेमी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देऊळगाव चषक स्पर्धेमुळे परिसरात क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळत असून युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्पर्धा यशस्वी होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.