महा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क…
गडचिरोली: राजकारणात पद आणि प्रतिष्ठा मिळाल्यानंतर अनेकजण आपल्या मूळ पेशाचा विसर पडू देतात. मात्र, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी काल पुन्हा एकदा सिद्ध केले की, ते आधी एक संवेदनशील ‘वैद्यकीय लोकसेवक’ आहेत आणि नंतर लोकप्रतिनिधी. २० मार्च २०२६ रोजी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान, एका आमदाराच्या प्रोटोकॉलपेक्षा एका डॉक्टरची माणुसकी अधिक उजळून निघाली.
जेव्हा ‘आमदार साहेब’ स्वतः स्टेथोस्कोप हातात घेतात…
डॉ. नरोटे हे पेशाने डॉक्टर असल्याने त्यांना रुग्णांच्या वेदनांची जाण उपजतच आहे. मतदारसंघात फिरत असताना केवळ कामाचा आढावा घेऊन ते थांबत नाहीत. काल धानोरा रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांनी थेट वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची भेट घेतली. यावेळी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले; खादीचा पेहराव घातलेले आमदार साहेब स्वतः रुग्णांच्या खाटेजवळ बसले, त्यांच्या नाड्या तपासल्या आणि डॉक्टरांच्या भूमिकेतून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.
रुग्णांशी थेट संवाद आणि सोयी-सुविधांची पाहणी
केवळ उपचारच नव्हे, तर रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाची गुणवत्ता, औषध साठा आणि रुग्णालयातील स्वच्छतेबाबत त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी सविस्तर चर्चा केली. “औषधं वेळेवर मिळतात का?” आणि “डॉक्टर रात्री उपलब्ध असतात का?” असे थेट प्रश्न विचारून त्यांनी प्रशासनालाही आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. एका वृद्ध रुग्णाशी संवाद साधताना डॉ. नरोटे म्हणाले, “काका, काळजी करू नका, मी स्वतः लक्ष ठेवून आहे. तुम्ही लवकर बरे होऊन घरी जाल.” हे शब्द ऐकताना त्या रुग्णाच्या डोळ्यांतील विश्वास बरेच काही सांगून गेला.
एक आशेचा किरण
दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी डॉ. नरोटे यांचा हा ‘अॅक्टिव्ह’ मोड जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. राजकारण्यांमध्ये दुर्मिळ होत चाललेली ही संवेदनशीलता पाहून धानोरावासीयांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
राजकारण हा माझा मार्ग असला, तरी वैद्यकीय सेवा हा माझा आत्मा आहे. माझ्या मतदारसंघातील शेवटच्या माणसाला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे, हाच माझा ध्यास आहे.”
डॉ. मिलिंद नरोटे, आमदार, गडचिरोली
………