Home Breaking News दक्षिण गडचिरोलीत रेल्वे लाईन सुरू करण्याची मागणी

दक्षिण गडचिरोलीत रेल्वे लाईन सुरू करण्याची मागणी

0
34

 

केंद्रीय रेल्वे मंत्री व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन…

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागात रेल्वे सुविधा सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अहेरी येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष सुनतकर यांनी याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दक्षिण गडचिरोली भागातील अनेक गावे अत्यंत दुर्गम असून रस्त्यांची परिस्थिती अनेक ठिकाणी खराब आहे. विशेषतः पावसाळ्यात अनेक गावांचा मुख्य शहरांशी संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना प्रवास, शिक्षण, आरोग्य सेवा तसेच रोजगाराच्या संधींसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

या भागात रेल्वे लाईन सुरू झाल्यास स्थानिक नागरिकांना सुरक्षित, जलद आणि स्वस्त प्रवासाची सुविधा मिळेल. तसेच युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि व्यापार, उद्योग, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गडचिरोली हा जिल्हा नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असून येथे खनिज संपत्ती, जंगलसंपदा आणि शेती उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास या संसाधनांचा योग्य उपयोग होऊन संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक प्रगतीला गती मिळू शकते.

या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन दक्षिण गडचिरोली भागात रेल्वे लाईन सुरू करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षण करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here