पेरीमिली महसूल मंडळ येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’मध्ये नागरिकांना प्रमाणपत्रे व पट्टे वितरित करताना तहसिलदार बालाजी सोमवंशी व उपस्थित अधिकारी.
अहेरी : ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ अंतर्गत अहेरी तालुक्यातील पेरीमिली महसूल मंडळ येथे शनिवार (दि. १४ मार्च २०२६) रोजी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे अध्यक्षस्थान अहेरीचे तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी भूषविले. सदर शिबिरात पेरीमिली महसूल मंडळातील सर्व गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात आला तसेच विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
शिबिरादरम्यान नागरिकांना ७२ डिजिटल सात-बारा, नमुना ८-अ चे ४६ उतारे तसेच १६७ विविध प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. याशिवाय एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत ५३ अर्जांचा निकाली निपटारा करण्यात आला.
भूमी अभिलेख विभागामार्फत स्वामित्व योजनेअंतर्गत १६ पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व खतांसंदर्भातील योजनांची माहिती व लाभ देण्यात आला. महिला व बालविकास विभागामार्फत विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांना त्याचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला.
ग्रामविकास विभागामार्फत नागरिकांना जन्म दाखले, मृत्यू दाखले तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याशिवाय उमेद, महावितरण, शिक्षण विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय आदी विविध विभागांच्या योजनांची माहिती व सेवा नागरिकांना देण्यात आल्या.
दरम्यान, या शिबिरासंदर्भातील गुगल शीटमधील प्रपत्र क्रमांक १ ते ८ अद्ययावत करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या समाधान शिबिरामुळे पेरीमिली मंडळातील नागरिकांच्या अनेक प्रलंबित कामांना गती मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.