Home Breaking News कोट्यवधींची पाण्याची टाकी सात वर्षांपासून निष्क्रिय; टेकडा ताला गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची...

कोट्यवधींची पाण्याची टाकी सात वर्षांपासून निष्क्रिय; टेकडा ताला गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

0
33

 

कोट्यवधींची पाण्याची टाकी सात वर्षांपासून निष्क्रिय; टेकडा ताला गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताला गावात कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली पाण्याची टाकी गेल्या सात वर्षांपासून वापरात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

त्यामुळे गावकऱ्यांना आजही शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या टेकडा ताला गावात सन २०१७–१८ मध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली होती. मात्र, सात वर्षे उलटूनही या टाकीतून ग्रामस्थांना थेंबभरही पाणी मिळालेले नाही.

गावात नळजोडणी करण्यात आली असली तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा सुरूच झालेला नाही. परिणामी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली ही पाण्याची टाकी सध्या केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याचे चित्र आहे.

शुद्ध पाण्याअभावी ग्रामस्थांना विहिरी, बोअरवेल तसेच नदी-नाल्यातील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. विशेषतः उन्हाळा व पावसाळ्यात दूषित पाणी पिण्याची वेळ येत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

उन्हाळा जवळ येत असताना गावात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने या योजनेतील त्रुटी दूर करून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते पेद्दी अशोक तसेच युवा नेते राकेश आंबीलपू यांनीही प्रशासनाने त्वरित कारवाई करून टेकडा ताला गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here