आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकारात अहेरीच्या विकासाला मिळणार गती
अहेरी:अर्थसंकल्पीय राज्याचा अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पदरात भरीव निधी पाडून घेण्यात अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांना मोठे यश आले आहे. मागील अनेक वर्षांपासून अहेरी शहराच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच या अधिवेशनात अहेरी शहरातील अंतर्गत रस्त्यांचे रूंदीकरण करण्याकरिता आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी तब्बल १० कोटी रुपयाचा निधी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मंजूर करून घेतला आहे. यामुळे अहेरी शहराच्या विकासाला गती मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष बाब म्हणजे, चंद्रपूर (घंटाचौकी) ते मुलचेरा मार्गे आलापल्ली या राज्य मार्ग क्रमांक ३७० दरम्यान असलेल्या मार्कंडा (देव) ते गोमणी या रस्त्याच्या बांधकामाकरिता तब्बल १० कोटी रुपयाचा निधी मंजूर करवून घेतला आहे. यासह सिरोंचा व अहेरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या रोमपल्ली-झिंगानूर कोपेला या जिल्हा मार्ग क्रमांक २६ च्या बांधकामाकरिता सुद्धा ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर करवून घेतला आहे. जवळपास या अर्थसंकल्पातून अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते विकासाकरिता आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी तब्बल २५ कोटी रुपयाचा निधी मंजूर करवून घेतला आहे. यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील महत्वाच्या कामाला गती मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रातून सिरोंचा, भामरागडकडे जाणाऱ्या मार्गाची दर्जोन्नती होऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वळते करण्यात आले आहे. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे राज्य व जिल्हा रस्त्यांचे बांधकाम होणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन माजी मंत्री तथा आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी विशेष पुढाकार घेऊन आपल्या विधानसभा क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचा विकास करण्याकरिता तब्बल २५ कोटी रुपयाचा निधी मंजूर करवून घेतला आहे. मुलचेरा-आलापल्ली दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. यासंदर्भात स्थानिकांकडून वारंवार रस्त्याच्या दुरूस्ती मागणी केली जात होती. याची दखल घेऊन धर्मरावबाबा आत्राम यांनी सदर निधी मंजूर करवून घेतला आहे. यासह अहेरी विधानसभा क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी निधीची मागणी करण्यात आली असून लवकरच सदर रस्त्यांच्या बांधकामासाठी निधी मंजूर होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला जात आहे.