Home Breaking News गडचिरोलीत ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा दिमाखात शुभारंभ; मुलींचे आरोग्य सुरक्षित करण्याचे प्रशासनाचे पाऊल

गडचिरोलीत ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा दिमाखात शुभारंभ; मुलींचे आरोग्य सुरक्षित करण्याचे प्रशासनाचे पाऊल

0
18

 

गडचिरोली, दि. ८ मार्च २०२६:
महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला (Cervical Cancer) प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर व आदरणीय आरोग्य राज्यमंत्री श्रीम मेघना बोर्डीकर यांच्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उत्साहात पार पडला. या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील १४ वर्षे पूर्ण व १५ वर्षाखालील असलेल्या किशोरवयीन मुलींना हे ‘सुरक्षा कवच’ मोफत दिले जाणार आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवाहन

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी या लसीचे महत्त्व अधोरेखित केले. “गर्भाशय मुखाचा कर्करोग हा वेळीच लसीकरण केल्यास पूर्णपणे टाळता येण्यासारखा आजार आहे. पालकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या मुलींचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी या मोहिमेत उस्फुर्त पणे सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.

​जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे यांनी मोहिमेच्या तांत्रिक बाबी आणि सूक्ष्म नियोजनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही लस सुरक्षित असून जगभरात ती प्रभावी ठरली आहे.

महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांनी किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक समस्या आणि लसीकरणाची गरज यावर प्रकाश टाकला. तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल हुलके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

“गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे, परंतु ‘एचपीव्ही’ लसीकरणामुळे हा धोका ९० टक्क्यांहून अधिक कमी करता येतो. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील एकही मुलगी या सुरक्षा कवचापासून वंचित राहू नये, यासाठी आमचे आरोग्य पथक सज्ज आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले आहे.

लाभार्थी मुलीचा पुढाकार

​या शुभारंभ प्रसंगी अस्मिता मन्ना सासमल (Asmita Manna Sasmal) या लाभार्थी मुलीला ‘एचपीव्ही’ लस देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. लस घेतल्यानंतर अस्मिताने आपला अनुभव सांगताना इतर मुलींना आणि पालकांना आवाहन केले की, “ही लस घेताना मला कोणताही त्रास झाला नाही. आपल्या भविष्यातील आरोग्यासाठी ही लस अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे माझ्यासारख्या इतर सर्व मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी पुढाकार घेऊन हे लसीकरण पूर्ण करून घ्यावे.”

घोषणांनी दुमदुमला रुग्णालय परिसर;* *जनजागृतीवर भर

​कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थित अधिसेविका, परिचारिका आणि आशा स्वयंसेविकांनी हातात जनजागृतीपर फलक घेऊन ‘एचपीव्ही’ लसीकरणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या. “कर्करोगाला हरवायचे आहे, लसीकरण करायचे आहे”, “सुरक्षित मुलगी, सुरक्षित भविष्य” अशा घोषणांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा परिसर दुमदुमून गेला होता. या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा संकल्प केला. ज्यामुळे मोहिमेच्या सुरुवातीलाच एक मोठी जनचळवळ निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

​उपस्थित मान्यवर आणि अधिकारी
​या प्रसंगी जिल्हा प्रशासनातील आणि आरोग्य विभागातील विविध तज्ज्ञ डॉक्टरांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये:
​डॉ. मनीष मेश्राम (भीशक, वर्ग-१)
​डॉ. शिवाजी लहाडे (सर्जन)
​डॉ. बागराज धुर्वे (निवासी वैद्यकीय अधिकारी, बाह्यसंपर्क) डॉ. प्रशांत पेंदाम (बालरोगतज्ञ), डॉ सचिन हेमके जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ अमित साळवे तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. अंजली साखरे (रक्त संक्रमण अधिकारी)​,डॉ. दिनेश रोकडे (जिल्हा आयुष अधिकारी) ​या कार्यक्रमाला जिल्हा सामान्य रुग्णालयातील सहा. अधिसेविका राखी गादेवार, प्रतिज्ञा रामटेके PHN यांनी सूत्रसंचालन केले, श्रीमती अर्चना प्रधान phn, श्रीमती अंजू यावले, परिसेविका, श्रीमती सारिका दुधे, पाठ्यनिर्देशिका, व इतर कर्मचारी कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्य विभागाने केलेल्या आवाहनानुसार, दुर्गम भागातील एकही मुलगी या लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये:

​पात्रता: १४ वर्षे पूर्ण परंतु १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुली. ​ठिकाण: सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि शासकीय रुग्णालये. ​नोंदणी: ‘U-WIN’ पोर्टल किंवा जवळच्या आशा स्वयंसेविकेशी संपर्क साधावा.

*​”आपल्या मुलीचे आरोग्य हीच जिल्ह्याची खरी संपत्ती आहे. चला, गडचिरोलीला कर्करोगमुक्त करण्यासाठी या मोहिमेला लोकचळवळ बनवूया.”*

डॉ वर्षा लहाडे)
जिल्हा शल्य चिकित्सक
गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here