Home Breaking News वनसंपदेचे संरक्षण करणे ही काळाची गरज : उप वनसंरक्षक दिपाली तलमले…. ...

वनसंपदेचे संरक्षण करणे ही काळाची गरज : उप वनसंरक्षक दिपाली तलमले…. वन वनवा जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ

0
24

अहेरी: दरवर्षी फेब्रुवारी ते जून महिन्यात जंगलात आग लागण्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर घडत असतात. यामुळे जंगलातील लाखों रुपयांच्या वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच जंगलात वास्तव्य करणाऱ्या वन्यप्राण्यांसह हजारो जीवजंतू व पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशा घटनांमध्ये गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. या घटनांना पूर्णपणे रोखून वनसंपदेचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आलापल्लीचे उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांनी केले.

आलापल्ली वनविभागांतर्गत वनवा जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी (२५ फेब्रुवारी) अहेरी वनपरिक्षेत्र कार्यालयातून करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी तहसीलदार प्रतीक आढाव, उपविभागीय वन अधिकारी शिशुपाल पवार, अहेरीचे ठाणेदार हर्षल एकरे, आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर, सामाजिक कार्यकर्ते बुद्धाजी सिडाम तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविभाग हे मौल्यवान वनसंपदेने नटलेले आहे. ही वनसंपदा अबाधित ठेवणे हे प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांची कर्तव्याची बाब असल्याचे त्यांनी म्हटले.पुढे बोलताना जंगल जळल्याने केवळ जैवविविधता नष्ट होत नाही, तर मातीची उर्वरकता कमी होते, धूप वाढते, हवाप्रदूषण वाढते आणि वनांची पाणी धारण क्षमता कमी होते. वन्यप्राणी, पक्षी, कीटक व सूक्ष्मजीवांचा मृत्यू होतो, शावक व घरटी जळून नष्ट होतात. अधिवास नष्ट झाल्याने प्राणी जंगलाबाहेर पडतात, ज्यामुळे शेती व मानवावर हल्ले वाढतात. त्यामुळे आलापल्ली वनविभाग आता अशा घटनांना पूर्णपणे रोखण्यासाठी सज्ज झाला असून, जनजागृती अभियान राबवित आहे. त्याचा शुभारंभ बुधवारी अहेरी वनपरिक्षेत्रातून झाला. सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान अहेरी वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत बुधवारी शहरात बाईक रॅली काढून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण इंगळे यांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनकर्मचाऱ्यांकडून गावागावात संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या बैठका घेऊन ग्रामस्थांशी वनव्याचे दुष्परिणाम व प्रतिबंधक उपायांवर चर्चा, सामुदायिक जबाबदारीची जाणीव करून देणे, तसेच अहेरी, इंदारम, खमणचेरू, लगाम व वेलगूर उपक्षेत्रांत बाईक रॅली व बॅनरद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगितले.

उपविभागीय वन अधिकारी शिशुपाल पवार यांनी आग रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष, नोडल ऑफिसर व टोल-फ्री नंबरची सुविधा असल्याचे सांगितले. मागील तीन वर्षांत जास्त आगी लागलेल्या ठिकाणी केआऱ् स्टेशन व कर्मचारी नियुक्ती, तसेच ‘वनवा मित्र’ संकल्पना राबवली जात असून त्यासाठी आकर्षक बक्षीस असल्याची माहिती दिली.

कला पथकाद्वारे गावोगावी जनजागृती

उन्हाळ्यात जंगलाला आग लागू नये यासाठी पूर्वतयारी सुरू आहे. मोह फुले व तेंदू पत्ता संकलन करणाऱ्यांना वनव्याचे नुकसान पटवून देण्यासाठी कला पथकाद्वारे जनजागृती होणार असून, त्याचा ट्रेलर बुधवारी अहेरी वनपरिक्षेत्रासमोर दाखविण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here