Home Breaking News मार्कंडा येथे ‘मिनी सरस महोत्सवा’चे दिमाखदार उद्घाटन

मार्कंडा येथे ‘मिनी सरस महोत्सवा’चे दिमाखदार उद्घाटन

0
21

 

मार्कंडा येथे ‘मिनी सरस महोत्सवा’चे दिमाखदार उद्घाटन;

ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ

गडचिरोली, दि. १६ : ग्रामीण भागातील महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या हाताला काम मिळावे तसेच त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने ग्रामविकास विभाग, ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान येथे ‘मिनी सरस महोत्सवा’चे आज थाटात उद्घाटन करण्यात आले. हा महोत्सव दि. १४ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला असून, महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात पार पडत आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी महिला बचत गटांच्या जिद्दीचे व आत्मविश्वासाचे कौतुक करत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले. “महिलांनी स्वयंपूर्णतेकडे टाकलेले हे पाऊल केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी दिशा देणारे आहे,” असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांना व्यवसाय वृद्धीबाबत मोलाचे सल्ले दिले. “उत्पादनासोबत गुणवत्ता, आकर्षक सादरीकरण आणि ग्राहकांशी विश्वासाचे नाते निर्माण करणे आवश्यक आहे. या महोत्सवाला भेट देणारा प्रत्येक ग्राहक समाधानाने परतला पाहिजे, असे नियोजन करा,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच महिलांनी पारंपरिक उत्पादनांबरोबरच नव्या व्यवसाय संधी शोधून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचेही त्यांनी सुचविले.

कार्यक्रमाची प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल कोळभोर यांनी केली. त्यांनी ‘मिनी सरस महोत्सवा’चा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेली विविध हस्तकला उत्पादने, खाद्यपदार्थ, घरगुती उपयोगाच्या वस्तू, कृषीपूरक उत्पादने आदी वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून महिलांना थेट विक्रीची संधी मिळून त्यांचा आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग अधिक बळकट होणार आहे.

महाशिवरात्री यात्रेनिमित्त मार्कंडा येथे मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील विविध स्वयं सहाय्यता समूहांनी आकर्षक पद्धतीने स्टॉल्स उभारले असून, स्थानिक उत्पादने खरेदीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here