Home Breaking News गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सभेत महत्त्वाचे ठराव; अधिसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सभेत महत्त्वाचे ठराव; अधिसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
33

 

गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सभेत महत्त्वाचे ठराव; अधिसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

गडचिरोली :दि. 8 जानेवारी 2026 गोंडवाना विद्यापीठाची दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली सिनेटची (अधिसभा) सभा अपरिहार्य कारणांमुळे तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब सभा मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पुन्हा संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी माजी अधिसभा सदस्य स्व. अॅड. गोविंद भेंडारकर, अधिसभा सदस्य रामदास आंबटकर, सामाजिक कार्यकर्ते मारोतराव कांबळे, सहकार नेते, शिक्षणतज्ञ अॅड. बाबासाहेब वासाडे, प्राचार्य जयदेव देशमुख, शिक्षकेत्तर कर्मचारी सोनाली भास्करवार
आदीच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी उपस्थित सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर अधिसभेच्या कामकाजास सुरुवात झाली.

अधिसभा सदस्य डॉ. पी. अरुणप्रकाश यांनी हे वर्ष संविधान अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत असताना, संविधान स्वीकृती दिनदर्शिकेनुसार विद्यापीठाच्या सर्व दस्तावेज, परिपत्रके व निर्देशांवर इंग्रजी तारखेसोबत भारतीय तारीख (शासकीय निर्देशांच्या अधीन राहून) नमूद करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव अध्यक्षांनी मान्य केला .

‘कर्मयोगी बाबा आमटे अध्यासन केंद्र’ सुरू करण्याबाबत डॉ. संजय साबळे यांनी मांडलेला प्रस्ताव सभागृहाने एकमताने मंजूर केला. यावेळी गुरुदास कांबळी व संजय गोरे यांनी भारतीय ज्ञानपरंपरा तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानाची नोंद घेऊन हे अध्यासन केंद्र कार्यान्वित करावे, असे मत व्यक्त केले. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

डॉ. दिलीप चौधरी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात यावे, या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठातील एलएलबी व एलएलएम अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजीसोबत मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

डॉ. विवेक शिंदे यांनी आत्मसमर्पित नक्षलवादी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून ‘गोंडवाना नवसंजीवन’ पुनरुत्थान कार्यक्रम राबविण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला. सभागृहाने या प्रस्तावास अनुमोदन देत ठराव पारित केला.

अधिसभा सदस्य गुरुदास कांबळी यांनी गोंडवाना विद्यापीठ, मौजा अडपल्ली येथील जागेवर विद्यापीठाची प्रशासकीय इमारत तातडीने उभारून नवीन कॅम्पस विकसित करण्याबाबत ठराव मांडला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

अधिसभा सदस्य दीपक धोपटे यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी देश व राज्यस्तरीय नामांकित विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांकरिता (जे.एन.यू.सारख्या) अभ्यास दौरा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. या अभ्यास दौऱ्यासाठी स्थानिक खनिज विकास निधीतून वार्षिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.

विद्यापीठात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत नीलेश बेलखेडे यांनी प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव सभागृहाने सर्वानुमते पारित केला.

डॉ. रुपेंद्रकुमार गौर यांनी संविधान अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भारतीय संविधानाची उद्देशिका गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक इमारतींच्या दर्शनी भागात गोंडी भाषेत लावण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमधून नागरिक कर्तव्यांविषयी जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा आयोजित करणे आणि नागरिक कर्तव्यांचा समावेश असलेला क्रेडिट-आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव संजय रामगिरवार यांनी मांडला. हा विषय डीन बोर्डामार्फत सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य करण्याबाबत कुलगुरूंनी मत व्यक्त केले आणि हा ठराव पारित करण्यात आला.

एकंदरीत विद्यापीठाच्या प्रशासकीय, शैक्षणिक व विकासात्मक बाबींवर चर्चा करण्यात येऊन त्यावर सिनेट सदस्यांनी आपली मते व्यक्त केली. आगामी शैक्षणिक वर्षातील नियोजनासंदर्भातही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

सिनेट सभेचे अध्यक्षस्थान कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी भूषविले. तसेच प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि सदस्य सचिव म्हणून कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण काम पाहिले. बैठकीस सिनेट सदस्य, विद्यापीठ अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here