Home Breaking News ३७२ गुन्ह्यांमधील १९.६७लाखांचा जप्त दारूसाठा केला नष्ट

३७२ गुन्ह्यांमधील १९.६७लाखांचा जप्त दारूसाठा केला नष्ट

0
33

 

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही चोरट्या मार्गाने येणाऱ्या अवैध दारूविरुद्ध देसाईगंज पोलिसांनी कडक पवित्रा घेतला आहे. सन २०२३ ते २०२५ या कालावधीत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला सुमारे १९ लाख ६७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल मंगळवार, ६ जानेवारी रोजी अधिकृतपणे नष्ट करण्यात आला. एकूण ३७२ गुन्ह्यांमधील हा मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीनंतर सार्वजनिकरीत्या विल्हेवाट लावून नष्ट करण्यात आला.

जिल्ह्यात दारूविक्री करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई होत असल्याने जप्त मुद्देमालाचे प्रमाण वाढले होते. जागेचा अभाव आणि मुद्देमाल नाशवंत असल्याने तो दीर्घकाळ जतन करणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे, न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय, देसाईगंज यांच्या परवानगीने ही प्रक्रिया पार पडली.

देसाईगंजचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक शुभम चौधरी यांच्या उपस्थितीत हा साठा नष्ट करण्यात आला. यासाठी जेसिबी आणि रोड रोलरचा वापर करून दारूच्या हजारो बाटल्यांचा चक्काचूर करण्यात आला. नष्ट करण्यात आलेल्या साठ्यामध्ये विदेशी दारू: १८० मिलीच्या ४०२ बाटल्या, २ लिटरच्या १२ बाटल्या आणि ९० मिलीच्या ११० बाटल्या. देशी दारू: १८० मिलीच्या ४ बाटल्या आणि ९० मिलीच्या तब्बल २०,९१६ बाटल्या. बिअर व इतरः ५०० मिलीचे ८२ टिन्स आणि ३०० मिलीच्या ७ बाटल्या. अशा एकूण १९,६७,७३० रुपयांच्या देशी-विदेशी दारूचा समावेश होता.

दारूच्या बाटल्या नष्ट केल्यानंतर तयार झालेला काचेचा चुरा आणि प्लास्टिकच्या बाटल्या जेसीबीच्या साहाय्याने एका मोठ्या खड्यात टाकून तो खड्डा मातीने पूर्ववत बुजविण्यात आला. ही विल्हेवाट लावताना पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, याची पूर्ण दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. पथकात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दुर्योधन सरपे, राजेंद्र मोहुर्ले, शैलेश तोरपकरवार, चितामण पिल्लारे, मीनाक्षी तोडासे आणि श्रद्धाप्रिया वंजारी यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here