०२ ते ०८ जानेवारी दरम्यान ‘पोलीस स्थापना दिन’ सप्ताहाचे आयोजन ; शस्त्र प्रदर्शन आणि जनजागृती उपक्रमांचा धडाका
गडचिरोली : महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौरवशाली
इतिहासातील मानाचा दिवस म्हणजेच ‘पोलीस स्थापना दिन’ (रेझिंग डे) शुक्रवारी (दि.०२) गडचिरोलीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित ‘रेझिंग डे’ सप्ताहाचा शुभारंभ पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत शहरातून काढण्यात आलेल्या शिस्तबद्ध आणि भव्य पथसंचलनाने झाला.
शुक्रवारारी सकाळी १० वाजता शहरातील कारगील चौकापासून या पथसंचलनाला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि बँड पथकाच्या तालावर निघालेले हे संचलन इंदिरा गांधी चौक येथे संपन्न झाले. या संचलनात पोलीस दलाच्या विविध शाखांनी सहभाग घेऊन वाहतूक नियम, सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षा विषयांचे फलक दर्शवत नागरिकांमध्ये जनजागृती केली.
पथक, बीडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक पथक) आणि ताफ्यातील शक्तिशाली एमपीव्ही (MPV) वाहनांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध ५ ते ६ शाळांमधील सुमारे ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या संचलनात उत्साहाने सहभाग नोंदवला.
०२ ते ०८ जानेवारी या सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन आणि पोलीस मदत केंद्रांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शस्त्र प्रदर्शनः शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची माहिती व प्रदर्शन. जनजागृतीः सायबर गुन्हेगारी, महिला सुरक्षा आणि पोलीस दलाच्या कामकाजाविषयी माहिती देणारे फलक प्रदर्शन. स्वच्छता अभियानः पोलीस वसाहती आणि परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन. या पथसंचलनामध्ये पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, पोलीस उप-अधीक्षक (गृह) स्वप्निल इंज्जपवार, प्रभारी अधिकारी विनोद चव्हाण आणि राखीव पोलीस उप-निरीक्षक दिवाकर सहारे यांच्यासह विविध शाखांचे अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळा, महिला महाविद्यालय, राणी दुर्गावती हायस्कुल, गोंडवाना सैनिकी विद्यालय, शिवाजी हायस्कुल आणि वसंत विद्यालय गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन पोलीस दलाप्रती आपला आदर व्यक्त केला.