अहेरी विधानसभा क्षेत्रात ‘अटल स्मृती संमेलन’ उत्साहात संपन्न… मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली प्रेरणादायी आयोजन
गडचिरोली : भारतरत्न, माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्रातील शासकीय विश्रामगृह, आलापल्ली येथे *अटल स्मृती संमेलन* चे भव्य आयोजन करण्यात आले होते. दि. २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले हे संमेलन माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
अध्यक्षीय भाषणात मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी श्रद्धेय अटलजींच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर तसेच त्यांच्या ऐतिहासिक राष्ट्रसेवेतील अमूल्य योगदानावर ओघवत्या व प्रेरणादायी शब्दांत प्रकाश टाकला. २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वाल्हेर येथे जन्मलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थी दशेपासूनच अटलजींना राष्ट्रसेवेची तीव्र ओढ होती. जनसंघापासून ते देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्याग, संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श आहे.
अटलजी हे केवळ राजकारणी नव्हते, तर कवी, विचारवंत, कुशल वक्ते, संवेदनशील नेता आणि खरे राष्ट्रभक्त होते, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
अटलजींच्या स्मृतींचे विश्लेषण करताना मा.खा. डॉ. नेते म्हणाले, “अटलजी शरीराने आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांनी ते आजही आपल्या सोबत आहेत. त्यांच्या स्मृतींना शतशः नमन. सत्ता येते-जाते; मात्र राष्ट्रहित जोपासणे हेच खरे ध्येय असले पाहिजे. भारतीय जनता पार्टी हा सत्तेसाठीचा पक्ष नसून राष्ट्रसेवेचा यज्ञ आहे.”
यावेळी त्यांनी अटलजींच्या प्रसिद्ध ओळींचा उल्लेख करत त्यांच्या मुत्सद्दी राजकारणाचे विविध पैलू उलगडले—‘न हार में, न जीत में, किंचित नहीं भयभीत मैं,संघर्ष पथ पर जो चले—यह भी सही, वह भी सही.’
अटलजींचे विचार, त्यांची राष्ट्रवादाची दृष्टी आणि त्यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग हा आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, असे मत मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी अध्यक्षीय निवेदनात व्यक्त केले.
या कार्यक्रमास ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोदजी आंकनपल्लीवार, जिल्हा सचिव सागर डेकाटे, बंगाली आघाडीचे नेते सुकमल हलदार, ज्येष्ठ नेते पोशालु चुधरी, युवा नेते अभिजित शेंडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अटलजींच्या विचारांना उजाळा देणारे हे ‘अटल स्मृती संमेलन’ उपस्थितांच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमटवून गेले.