Home Breaking News ३० हजारांची लाच घेताना मुख्य अभियंता एसीबीच्या जाळ्यात; नागपुरातील मोठी कारवाई

३० हजारांची लाच घेताना मुख्य अभियंता एसीबीच्या जाळ्यात; नागपुरातील मोठी कारवाई

0
6

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयात रंगेहाथ पकडले; परवाना नूतनीकरणासाठी मागितली होती लाच

नागपूर, प्रतिनिधी :

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयातील मुख्य अभियंता सुभाष बबन भुजबळ यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्याने नागपूर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शासकीय कंत्राटदाराच्या परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे नोंदणीकृत कंत्राटदार असून महाराष्ट्र शासनाची विविध कामे करतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत शासकीय कामे करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी त्यांनी प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे ऑनलाइन अर्जासह आवश्यक कागदपत्रे सादर केली होती.

मात्र, परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेच्या मागणीची खात्री झाल्याने एसीबीने सापळा रचला.

बुधवारी (१० जून) करण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयातील आपल्या दालनात तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुभाष भुजबळ यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर त्यांच्याविरुद्ध नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक भारती गुरनुले यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

दरम्यान, राज्यातील भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेला या कारवाईमुळे आणखी बळ मिळाले असून, शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. :::

बॉक्स :

“परवाना नूतनीकरणासाठी ३० हजारांची मागणी; मुख्य अभियंत्याला एसीबीने कार्यालयातच रंगेहाथ पकडले!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here