![]()
ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा सवाल; चौकशी न झाल्यास जनआंदोलनाचा भाकपाचा इशारा
जप्राबाद, प्रतिनिधी :
सिरोंचा तालुक्यातील जप्राबाद ग्रामपंचायतीत विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असला, तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गावात उभारण्यात आलेल्या दोन पाणी टाक्या आणि स्वच्छता व्यवस्थेसाठी आणलेली घंटागाडी सध्या वापराअभावी निष्क्रिय पडून असून त्या केवळ शोभेच्या वस्तू ठरत असल्याची तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
गावातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठ्याचा लाभ मिळावा या उद्देशाने लाखो रुपये खर्चून दोन पाणी टाक्यांची उभारणी करण्यात आली. मात्र या टाक्या प्रत्यक्षात कितपत कार्यान्वित आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अनेक नागरिकांना अजूनही पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे सांगितले जात आहे.
याचबरोबर ग्रामपंचायतीकडे नुकतीच उपलब्ध झालेली नवीन घंटागाडीही वापराअभावी धूळ खात पडल्याचे दिसून येत आहे. गावातील स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासाठी आणलेल्या या वाहनाचा उपयोग होत नसल्याने शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
एकीकडे पाणीटंचाई, स्वच्छतेचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था यांसारख्या मूलभूत समस्या कायम असताना दुसरीकडे लाखो रुपयांच्या योजनांचा लाभ कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून खर्च झालेल्या निधीचा हिशोब सार्वजनिक करावा, तसेच निष्क्रिय पडलेल्या पाणी टाक्या आणि घंटागाडी तात्काळ कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरत असून प्रशासन याकडे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.