![]()
करचखेडा बेटावरून परतताना घडली थरारक दुर्घटना; शोध व बचाव पथकाचे युद्धपातळीवर अभियान सुरू
भंडारा | प्रतिनिधी
भंडारा शहराजवळील वैनगंगा नदीत रविवारी रात्री घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. करचखेडा येथील नदीपात्रातील बेटावर अंघोळीसाठी गेलेल्या सात मित्रांच्या बोटीला नदीच्या मध्यभागी अपघात होऊन ती अचानक पलटल्याने दोन तरुण नदीच्या अथांग पाण्यात बेपत्ता झाले आहेत. तर मृत्यू समोर दिसत असतानाही प्रसंगावधान राखत पाच तरुणांनी पोहत किनारा गाठून आपले प्राण वाचविले.
बेपत्ता झालेल्या तरुणांमध्ये पवन मुरली चौबे (३४, आंबेडकर वॉर्ड, भंडारा) व कृष्णा जगन्नाथ बोकडे (२६, चांदणी चौक, भंडारा) यांचा समावेश आहे. तर आकाश केवट, सुबोध ढोक, काशीनाथ मेश्राम, मृनाल मंदुकर आणि अर्जुन मेश्राम यांनी धाडस दाखवत नदीबाहेर येण्यात यश मिळविले.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा शहरातील सात मित्र रविवारी सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले होते. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांनी करचखेडा येथील वैनगंगा नदीपात्रातील एका बेटावर जाण्यासाठी खासगी बोटीचा वापर केला. बेटावर काही वेळ घालवून अंघोळ केल्यानंतर रात्री ते परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र नदीच्या मध्यभागी पोहोचताच पाण्याचा अंदाज न आल्याने बोट अचानक असंतुलित होऊन उलटली.
क्षणात सातही जण खोल पाण्यात फेकले गेले. अंधार, पाण्याचा वेग आणि जीवघेणी परिस्थिती यांच्याशी झुंज देत पाच जणांनी पोहत किनारा गाठला. मात्र पवन चौबे आणि कृष्णा बोकडे यांना बाहेर पडता न आल्याने ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला कळविल्यानंतर जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा शोध व बचाव पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले असून रात्रीपासूनच नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
स्थानिक मच्छीमार, बचाव पथक आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून बोटी व अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने दोन्ही तरुणांचा शोध घेतला जात आहे. मात्र नदीतील वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि अंधारामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. तरीही प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू असून बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे भंडारा शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोन्ही तरुणांच्या सुखरूप शोधासाठी नागरिकांकडून प्रार्थना केली जात आहे.